पतंगाचा मांजा जीवावर बेतणार; यंदाही मकरसंक्रांतीत पक्ष्यांचा बळी जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 23:23 IST2020-01-12T23:22:04+5:302020-01-12T23:23:36+5:30
एकीकडे पतंग उडवण्याचा आनंद साजरा होत असतानाच या पतंगांसाठी वापरण्यात येणारा मांजा (दोरा) हा अनेक वेळा पक्षांच्या जीवावर बेतणारा ठरतो.

पतंगाचा मांजा जीवावर बेतणार; यंदाही मकरसंक्रांतीत पक्ष्यांचा बळी जाणार?
राहुल वाडेकर
विक्रमगड : डिसेंबर महिन्याचा शेवट आणि जानेवारीच्या सुरुवातीला असंख्य नागरिकांना वेड लागते ते पतंगांचे. मकरसंक्रांतीच्या निमित्तााने आकाशात मोठ्या प्रमाणावर पतंग उडवताना दिसून येतात. मकरसंक्रांतीला तीळगुळाबरोबरच पतंगांचे वैशिष्ट्य मानले जाते. या पार्श्वभूमीवर विक्रमगडच्या बाजारात पतंग विक्रीसाठी दाखल झाले असून पतंग खरेदीची लगबगही सुरु झाल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे पतंग उडवण्याचा आनंद साजरा होत असतानाच या पतंगांसाठी वापरण्यात येणारा मांजा (दोरा) हा अनेक वेळा पक्षांच्या जीवावर बेतणारा ठरतो. पतंग कापाकापीच्या स्पर्धेमध्ये आपण जिंकावे या उद्देशाने अनेक जण धारधार मांज्याचा वापर करतात. या धारधार मांज्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून अनेक पक्षांना आपला जीव गमवावा लागला आहे. पक्षांना इजा पोहविण्याचा कोणाचाही उद्देश व हेतू नसतो, अगर कुणीही जाणूनबुजून करत नाही. परंतु स्पर्धेमध्ये आकाशात लांब गेलेल्या पतंगाच्या मांज्यामध्ये आकाशात भराऱ्या मारणारे पक्षी अडकून त्यांना इजा होण्याचा संभव असतो. त्यामुळे यंदा पतंग उडविताना जरा जपून असा सल्ला पक्षीमित्रांनी दिला आहे. अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या मकरसंक्रांतीच्या निमित्ताने बाजारात सध्या वेगवेगळ्या रंगाचे, आकाराचे पतंग दाखल झाले आहेत.