उद्धव ठाकरेंना भाजपा पुन्हा सोबत घेणार?; चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 03:54 PM2023-03-29T15:54:00+5:302023-03-29T15:54:41+5:30
मतभेद असू शकतात. मते मतांतरे असू शकतात. मनभेदही संवादाने सुटतात.
मुंबई - उद्धव ठाकरे नौटंकी करतात. ते काँग्रेस सोडणार नाही. उद्धव ठाकरेंनी सावरकरांच्या अपमानावरून तुम्ही ठाकरेबाणा दाखवा, राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारा. मी आजही अभिनंदन करायला तयार आहे. उद्धव ठाकरेंनी सावरकरांच्या अपमानाचा बदला मविआतून काँग्रेसला हाकलवून घ्या मी जाहीर अभिनंदन करेन. भाजपा विश्वासघातकी लोकांना कधीही आपल्यासोबत घेत नाही असं सांगत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा युतीला स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.
आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मतभेद असू शकतात. मते मतांतरे असू शकतात. मनभेदही संवादाने सुटतात. पण विश्वासघाताला जागा नाही. उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांसोबत विश्वासघात केला. पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील ते भाजपाने प्रत्येक सभेत जाहीर केले होते. तेव्हा तुम्ही आक्षेप का घेतला नाही, हे राज ठाकरेंनीही सांगितले. त्यामुळे विश्वासघातकाला जागा नाही असं त्यांनी म्हटलं.
दोघांची जोडी, लय भारी
एकनाथ शिंदेंसारखा कर्तव्यदक्ष आणि १८ तास काम करणारा व्यक्ती, गरिबीतून वर आलेले, समाजातील शेवटच्या माणसाचं दु:खं जाणणारे आहेत. एकीकडे महाराष्ट्रात प्रशासकीय अनुभव आणि देशात राज्याला नंबर वन नेणारे देवेंद्र फडणवीस दुसरीकडे आपले संपूर्ण आयुष्य जनतेसाठी देणारे एकनाथ शिंदे. या दोघांची जोडी महाराष्ट्राला वेगाने विकासाच्या मार्गावर नेत आहे. पुढील ५ वर्ष या जोडीला मिळाली तर महाराष्ट्र देशात क्रमांक १ चं राज्य होईल. जगात भारताची बलाढ्य शक्ती निर्माण होणार आहे त्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा असेल असं कौतुक भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
त्याचसोबत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघेही ताकदीचे नेते आहेत. फडणवीसांचे आयुष्य निष्कलंक आहे. मी अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम केलय. अष्टपैलू कर्तृत्व आहे. दोघेही जोरदार बॅट्समन आहे. त्यामुळे कितीही शक्ती त्यांच्यासमोर आल्या हे दोघे जनतेसमोर मतं मागायला जातील तेव्हा साऱ्यांना फटका बसल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही बावनकुळेंनी दिला.