भाजपाचा पारंपरिक मतदार ‘नोटा’चा वापर करणार?
By admin | Published: May 4, 2017 05:49 AM2017-05-04T05:49:59+5:302017-05-04T05:49:59+5:30
भिवंडीच्या निवडणुकीत भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी कोणार्क विकास आघाडीशी केलेल्या समझोत्यामुळे पक्षात उठलेले बंडाचे वादळ
भिवंडी : भिवंडीच्या निवडणुकीत भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी कोणार्क विकास आघाडीशी केलेल्या समझोत्यामुळे पक्षात उठलेले बंडाचे वादळ शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. ही नवी युती लादल्यास संघाचे कार्यकर्ते, संघ परिवाराच्या अन्य संघटनांतील नेते आणि भाजापाच्या निष्ठावंतांनी मतदानावेळी ‘नोटा’चा वापर करून आपली नाराजी दाखवून देण्याचा निर्णय घेतला आहे.
पक्षात गेल्या अडीच-तीन वर्षांत रूजलेल्या नवभाजपावादी संस्कृतीला विरोध करण्यासाठी काही नेत्यांनी गेल्या दोन दिवसांत मुंबईत जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. शिवाय पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाराजी कळवणारी पत्रे दिली. तेव्हा वरिष्ठ नेत्यांनी कोणार्कशी समझोता झाला नसल्याचे सांगितले. मात्र कोणार्कला सोडल्या जाणाऱ्या जागा, महापौरपदासाठी विशिष्ट नेत्यांच्या घरातील उमेदवाराचे पुढे येणारे नाव आणि प्रत्यक्ष मतदारसंघांत युती म्हणून भाजापा-कोणार्कचा सुरू असलेला प्रचार यामुळे स्थानिक नेते, कार्यकर्ते बिथरले आहेत. भाजपाचा पारंपरिक मतदार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बंडाची भाषा सुरू केली आहे.
त्यापैकी प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्या सुगंधा टावरे, अविनाश काठवले, वैभव भोईर, हर्षल पाटील, ललित पाटील आणि इतरांनी वरिष्ठांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. काहींनी ही युती मान्य नसल्याची लेखी पत्रे दिली. भाजपा गोवंश विकास प्रकोष्ठचे संयोजक अशोक जैन यांनी भाजपा प्रदेश संघटन मंत्री रवींद्र भुसारी यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांतील नाराजी त्यांच्यापुढे मांडली. तसेच कोणार्कशी होत असलेल्या समझोत्याबाबत संशय व्यक्त केला.
भिवंडीच्या ज्या बालेकिल्यातून हिंदुत्व व राष्ट्रहिताची चळवळ सुरू होते. त्या ठिकाणी कोणार्क आघाडीसाठी पारदर्शकता दाखविणे कार्यकर्त्यांना कठीण आहे, अशी भावनाही भुसारी यांच्या कानी घालण्यात आली. मुख्यमंत्री नेहमी पारदर्शक कारभाराचा आदर्श ठेवतात. त्यामुळे भिवंडीतील ही अपारदर्शकता त्यांना आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना लेखी पत्रातून कळवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शहराध्यक्ष संतोष शेट्टी, आमदार महेश चौघुले व खासदार कपील पाटील यांनाही ही भावना मांडणारी पत्रे देण्यात आल्याचे अशोक जैन यांनी सांगितले. त्यावर भुसारी यांनी नवी युती करणार नसल्याची माहिती दिली. पण प्रत्यक्षात संघाचे प्राबल्य असलेल्या प्रभागात या नव्या युतीनुसार प्रचार सुरूही झाला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या भागातील तरूण गेली काही वर्षे भाजपाचा प्रचार करून संघटनेचे काम करीत आहेत. ज्यांना पाच वर्षात सत्तेत राहूनही शहराड्या, प्रभागाच्या समस्या सोडविता नाही आल्या, अशांच्या नेतृत्वाखाली काम करणे हा भिवंडीकरांवर अन्याय असल्याने त्यांना मत देण्यापेक्षा ‘नोटा’चा पर्याय स्वीकारण्याकडे नागरिकांचा कल राहील, असा इशारा अशोक जैन यांनी दिला.
भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाने समझोत्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर भाजपाचे गजानन शेटे शिवसेनेत गेले, तर अविनाश काठवळे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)
भाषक गटांचेही प्राबल्य
भिवंडीत तेलगू, उत्तर भारतीय, गुजराती-मारवाडी अशा विविध भाषक गटांचे प्राबल्य आहे. त्यांच्या प्रभावक्षेत्रात त्यांच्या समाजाचे उमेदवार देण्याचा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न सुरू आहे. हे गट आपल्यासोबत यावे यासाठी भाजपाच्या नेत्यांनी त्यात्या राज्यातील नेत्यांकडून काही गटांशी संपर्क साधल्याची चर्चा आहे.
मुस्लिमांबाबत भाजपाचा उत्तर प्रदेश पॅटर्न
उत्तर प्रदेशात मुस्लिम समाजातील एकही उमेदवार न देता भाजपाने निवडणूक लढवली.
त्याचपद्धतीने भिवंडीतही त्या समाजाचा विचार न करता निवडणूक लढवावी, असा मतप्रवाह पक्षात आहे किंवा कोणार्क आघाडीमार्फत त्या समाजाचे उमेदवार रिंगणात उतरवायचे असा प्रयत्न सुरू आहे.
मुस्लिम समाजातही कोकणातील मुस्लिमांचे प्रमाण कमी आहे. उत्तर भारतीय मुस्लिम, दक्षिणेतील खास करून हैदराबादी मुस्लिम असे विविध समूह भिवंडीत आहेत. त्या गटांना आपलेसे करण्यासाठी काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम यांचे प्रयत्न सुरू आहेत.
त्याचवेळी भाजपाच्या नेत्यांनीही मुस्लिम व्होट बँक तयार करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र उत्तर प्रदेशच्या निकालामुळे त्यांच्यात चलबिचल सुरू असल्याचे समजते.
भिवंडीत आचारसंहिता
भंग केल्याचा गुन्हा
भिवंडी : मौजे नागाव येथे विजेच्या खांबावर डॉ. शफीक अहमद सिध्दिकी यांनी आपल्या पक्षाच्या चिन्हासह बॅनर लावल्याने त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याचाही मुद्दा शांतीनगर पोलीस स्टेशनमधील गुन्ह्यात नोंदवला आहे.