महापौर आणेल, अन्यथा निवडणूक लढणार नाही!
By admin | Published: January 24, 2017 10:47 PM2017-01-24T22:47:50+5:302017-01-24T22:47:50+5:30
महानगरपालिकेच्या निवडणुकीत महापौर निवडून आणेल, अन्यथा मी भविष्यात निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी केली.
राष्ट्रवादी पक्षप्रवेश सोहळा : गुलाबराव गावंडे यांची घोषणा
अकोला : अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस जोमाने काम करेल, यावेळी आघाडीचा महापौर नक्कीच होईल, असा विश्वास व्यक्त करीत आघाडीचा महापौर निवडून आणेल, अन्यथा मी भविष्यात निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी केली.
येथील खुले नाट्यगृहामध्ये त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश सोहळ्यानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार प्रकाश गजभिये, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंतराव धोत्रे, माजी आमदार तुकाराम बिरकड, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडीचे संग्राम कोते पाटील, अकोला जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, महानगर अध्यक्ष अजय तापडिया, वाशिम जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, विदर्भ संघटक रामेश्वर पवळ व संतोष कोरपे आदी उपस्थित होते.
गावंडे म्हणाले, की शिवसेना-भाजपाने अकोला शहराला भकास केले. हे दोन्ही पक्ष शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद निश्चितच वाढणार आहे. जिल्हाध्यक्ष विजय देशमुख व मी गुरू-शिष्य आहोत. आता नव्या दमाने एकत्र काम करण्यासाठी सज्ज झालो आहोत, त्यामुळे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता नक्कीच येईल. जर सत्ता आणू शकलो नाही, तर भविष्यात कुठलीच निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली. जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मनपा निवडणुकीत मोठी ताकद निर्माण करणार असल्याचे सांगत, गावंडे यांच्या प्रवेशामुळे पक्षाला बळ मिळाल्याचे त्यांनी सांगितले. महानगर अध्यक्ष अजय तापडिया यांनी प्रस्तावना केली. संचालन दिलीप आसरे तर आभार संग्राम गावंडे यांनी केले. यावेळी श्रीकांत पिसे पाटील, रमेश हिंगणकर, शिरीष धोत्रे, ऋषिकेश पोहरे, सै. युसूफ अली, रफीक सिद्दिकी, आशा मिरगे, पद्मा अहेरकर, मंदा देशमुख व सचिन वाकोडे आदी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमासाठी संग्राम गावंडे व युवराज गावंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.