सहा दिवसांत उडीद-मूग खरेदी करणार!
By admin | Published: September 5, 2016 12:39 AM2016-09-05T00:39:06+5:302016-09-05T01:48:45+5:30
खामगाव येथील सत्कार सभारंभात उडीद-मूग खरेदी करणार असल्याची घोषणा कृषिमंत्र्यांनी केली.
खामगाव (जि.बुलडाणा), दि. ४: शेतकर्यांकडे शेतमालाची आवक सुरू झाली, की शेतमालाचे भाव पडतात. मालाची शेतकर्यांकडून खरेदी आटोपताच लगेचच भाववाढ होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी येत्या सहा दिवसांमध्ये नाफेडकडून उडीद-मूग खरेदी केली जाणार असल्याची घोषणा कृषी व फलोत्पादन मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी येथे केली. ते येथे कृषिसेवा केंद्राच्यावतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, की शेतकर्यांच्या शेतमालासाठी हमी भाव शासनाने ठरवून दिले आहेत. तथापि, मुगाची आवक सुरू होताच, बाजारात मुगाचे भाव पडले. हमीभावापेक्षाही कमी दराने मुगाची खरेदी केली जात असल्याचे आपल्या निदर्शनास आले आहे. हीच परिस्थिती उडीद आणि इतर शेतमालाची आवक होताच असते. त्यामुळे शेतकर्यांना न्याय देण्यासाठी येत्या सहा दिवसांमध्ये उडीद आणि मुगाची खरेदी नाफेड मार्फत केली जाईल. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन आपल्या स्तरावर उपाययोजना करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शेतकर्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी युरियाचे भाव कमी करण्यात आले आहेत. उत्पादन आधारित भाव देत नसाल तर, शेतकर्यांचा उत्पादन खर्च कमी करण्याची शासनाची भूमिका असल्याचेही ते शेवटी म्हणाले.
आपण 'मॅनेज' होणार्यांपैकी नाही!
कृषिमंत्री पदाची धुरा घेताच, आपल्याकडे अनेक प्रस्ताव आले. कृषी क्षेत्रातील कडक धोरणामुळे काहींकडून दबावही आला. मात्र, शेतकर्याचा पुत्र असल्यामुळे आपण सर्व दबाव आणि प्रस्ताव झुगारून शेतकरी हिताचे काम करीत आहोत. ह्यमॅनेजह्ण होऊन पैसे आपल्याला कमवायचे नाहीत. विरोधी पक्ष नेता असतानाही, अनेक आमिष आपणाला आलीत. पण, आपण त्याला बळी पडलो नाहीत. देवाने पोटाला पुरेल एवढं दिले आहे. 'मॅनेज' होणार्यांपैकी आपण नाही, असे ते म्हणाले. वेगळ्या मार्गाने आणि अतिरिक्त पैसा कमविणार्यांचे काय हाल होताहेत, हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.