जनशताब्दीची वेळ बदलणार?
By admin | Published: June 12, 2014 04:06 AM2014-06-12T04:06:07+5:302014-06-12T04:06:07+5:30
कोकण रेल्वेमार्गावर एसी डबल डेकरसाठी दुसऱ्या ट्रेनचा बळी देण्याचा प्रयत्न रेल्वेकडून केला जाणार आहे.
मुंबई : कोकण रेल्वेमार्गावर एसी डबल डेकरसाठी दुसऱ्या ट्रेनचा बळी देण्याचा प्रयत्न रेल्वेकडून केला जाणार आहे. एसी ट्रेनसाठी कोकणवासीयांना फायदेशीर ठरणाऱ्या जनशताब्दी ट्रेनची वेळ बदलण्याचा विचार रेल्वेकडून सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ही वेळ बदलल्यास कोकणवासीयांना त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
मध्य आणि कोकण रेल्वेमार्गावरून एसी ट्रेन मोठ्या प्रमाणात धावत असून, प्रत्यक्षात कोकणसाठी एसी ट्रेन सुरू करावी, अशी मागणी वर्षानुवर्षे होत होती. त्यानंतर एलटीटी ते मडगाव अशी एसी डबल डेकर ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि मध्य रेल्वेच्या एलटीटी ते रोहा, तर पुढे कोकण रेल्वेमार्गावर या ट्रेनच्या चाचण्याही नुकत्याच घेण्यात आल्या. या चाचणीचा अहवाल मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे आल्यानंतर रेल्वे बोर्डाकडे याची माहिती जाईल आणि त्यानंतरच सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. ही ट्रेन कोकणवासीयांसाठी जरी फायदेशीर ठरणार असली तरी या ट्रेनसाठी जादा क्षमता असलेल्या जनशताब्दी एक्स्प्रेसचा बळी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. १२ डब्यांची दादर-मडगाव अशी दररोज धावणाऱ्या जनशताब्दीची दादरमधून सुटण्याची वेळ पहाटे साडेपाचची असून, मडगावहून सुटण्याची वेळ दुपारी अडीच वाजताची आहे. या ट्रेनमुळे एसी डबल डेकर ट्रेन प्रवाशांसाठी सोयीची ठरत नसल्याचे म्हणणे रेल्वेचे असून, जनशताब्दीची वेळ बदलण्याचा विचार रेल्वेकडून केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)