२०२४ पर्यंत काँग्रेस-NCP चे नेते भाजपात येणार?; प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 03:51 PM2022-11-05T15:51:00+5:302022-11-05T15:51:20+5:30

राहुल गांधी यांची यात्रा त्या पक्षातील नेत्यांनी ‘हायजॅक’ केली असून त्यांच्या पक्षाला यात्रेचा काही फायदा होणार नाही, उलट नुकसानच होईल असं त्यांनी म्हटलं. 

Will Congress-NCP leaders join BJP by 2024?; State President Chandrasekhar Bawankule claim | २०२४ पर्यंत काँग्रेस-NCP चे नेते भाजपात येणार?; प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा दावा

२०२४ पर्यंत काँग्रेस-NCP चे नेते भाजपात येणार?; प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा दावा

googlenewsNext

ठाणे - काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर त्या पक्षातील नेत्यांचा कब्जा आहे. ते कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांना भेटू देत नाहीत. परिणामी या यात्रेमुळे त्यांचा पक्ष वाढण्याच्या ऐवजी कमकुवत होत आहे. अन्य पक्षातील नेते – कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करत नाहीत. उलट काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. नंदूरबारच्या काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी आजच भाजपामध्ये प्रवेश केला. २०२४ ची आगामी निवडणूक येईपर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते भाजपामध्ये प्रवेश करतील असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. 

ठाणे जिल्ह्याच्या संघटनात्मक प्रवासादरम्यान ते ठाणे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे त्यांच्या पक्षात चैतन्य निर्माण होऊन इतर पक्षांतील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये जाण्याच्या ऐवजी काँग्रेसमधून भाजपामध्ये कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. राहुल गांधी यांची यात्रा त्या पक्षातील नेत्यांनी ‘हायजॅक’ केली असून त्यांच्या पक्षाला यात्रेचा काही फायदा होणार नाही, उलट नुकसानच होईल असं त्यांनी म्हटलं. 

किमान २०० जागांवर विजयी होऊ
भाजपा आगामी निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना पक्षासोबत युती करून लढवेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अफाट लोकप्रियता, त्यांच्या सरकारचे काम, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारचे काम आणि पक्षाच्या संघटनात्मक ताकदीच्या जोरावर आम्ही यश मिळवू. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात ४८ पैकी किमान ४५ जागा व विधानसभा निवडणुकीत किमान २०० जागांवर आम्ही यशस्वी होऊ. आमच्या विरोधात तीनही पक्ष एकत्र आले तरी आम्ही विजय मिळवू असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. 

त्याचसोबत महाविकास आघाडी ही वैचारिक आधारावर नव्हे तर केवळ भाजपाला दूर ठेऊन सत्ता मिळविण्यासाठी निर्माण झाली. पण विचार सोडल्यामुळे आता पारंपरिक मतदार दुरावण्याच्या भितीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे शिवसेनेवर टीका करत आहेत, असा टोला भाजपाने लगावला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Will Congress-NCP leaders join BJP by 2024?; State President Chandrasekhar Bawankule claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.