भविष्यात आपल्याकडे भोजनासाठी नक्की येईन; पवारांच्या पत्राला शिंदे-फडणवीसांचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 07:57 AM2024-03-02T07:57:50+5:302024-03-02T07:58:21+5:30
नमो रोजगार मेळावा आणि अन्य कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी बारामतीत असतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बारामतीत विविध कार्यक्रमांमध्ये शनिवारी व्यग्र राहणार असल्याने भोजनाच्या आपल्या आग्रही आमंत्रणाला मान देणे, यावेळी शक्य होणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांना पत्राद्वारे कळविले आहे.
नमो रोजगार मेळावा आणि अन्य कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी बारामतीत असतील. हे औचित्य साधून शरद पवार यांनी या तिघांना आपल्या ‘गोविंदबाग’ या निवासस्थानी पत्राद्वारे भोजनाचे निमंत्रण दिले होते.
मुख्यमंत्री शिंदे यांनी पवार यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे इच्छा असूनही मी आपल्याकडे येऊ शकणार नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. भविष्यात आपल्याकडे भोजनाचा योग नक्की येईल, असे मला वाटते.
फडणवीस यांनीम्हटले आहे की...
बारामतीतील भरगच्च कार्यक्रम, त्यानंतर वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन, त्यानंतर लगेचच आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन असे कार्यक्रम लागोपाठ असल्याने आपल्या आग्रही निमंत्रणाला मान देणे, यावेळी तरी शक्य होणार नाही.