पंकजा घेणार धनंजय मुंडेंची जागा ? विरोधीपक्ष नेतेपदी लागू शकते वर्णी !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 02:23 PM2019-12-02T14:23:54+5:302019-12-02T14:25:23+5:30
भाजप विरोधात बसले असून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. अशा स्थितीत पंकजा यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांच्यकडे विरोधीपक्षनेते पदाची जबाबदारी देण्यात येऊ शकते. असं झाल्यास, त्यांना धनंजय मुंडेची जागा मिळणार हे स्पष्टच आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्या राजकीय भूमिकेविषयी चर्चांना उधाण आले आहे. पंकजा यांनी देखील आपण 12 डिसेंबरला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले. त्यांच्या या पावित्र्यामुळे भाजपकडून त्यांची वर्णी विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदी लागू शकते, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहेत.
राज्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरूनही भारतीय जनता पक्षावर विरोधात बसण्याची वेळ आली आहे. भाजपने नरमाईची भूमिका न घेतल्यामुळे शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जावून सत्ता स्थापन केली. यामुळे भाजप विरोधात बसले असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधीपक्षनेतेपदी निवड झाली आहे.
दरम्यान भाजप सत्तेत येऊ न शकल्याने माजीमंत्री पंकजा मुंडे पेचात अडकल्या आहेत. या संदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. मात्र भाजपकडून त्यांना विधान परिषदेवर संधी मिळेल, अशी शक्यता आहे. अशा स्थितीत त्यांना विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेते पदाची संधी मिळू शकते.
याआधी धनंजय मुंडे विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदी होते. धनंजय मुंडे यांना या पदाचा राज्यभर आपला संपर्क निर्माण करण्यासाठी फायदा झाला होता. किंबहुना परळीतून विजय मिळवणे त्यांना सोपे झाले होते. आता भाजप विरोधात बसले असून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. अशा स्थितीत पंकजा यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांच्यकडे विरोधीपक्षनेते पदाची जबाबदारी देण्यात येऊ शकते. असं झाल्यास, त्यांना धनंजय मुंडेची जागा मिळणार हे स्पष्टच आहे.