स्वप्न प्रजेच्या सत्तेचे कधी होणार साकार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 04:13 AM2019-01-26T04:13:19+5:302019-01-26T04:14:14+5:30
आपण प्रजासत्ताकात राहतो; असे वेळोवेळी भाषणात बोलतो-ऐकतो. प्र
आपण प्रजासत्ताकात राहतो; असे वेळोवेळी भाषणात बोलतो-ऐकतो. प्रजासत्ताक शासनपद्धती. गणतंत्र शासनव्यवस्था... स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान अमलात आल्याचा दिवस. लोककल्याणकारी राज्याची संकल्पना आपण स्वीकारली. त्याला साडेसहा दशकांहून अधिक काळ लोटला. या काळात देशाने अनेक बदल स्वीकारले. स्थित्यंतरे पाहिली; पण देशात खरेच प्रजेची सत्ता आली आहे का? भारताचे प्रजासत्ताक नेमके कसे आहे? ते कागदावरचे आहे की वास्तवातले, ते राबवणाऱ्यांपुरते आहे की, राबणाºयांचे? या प्रश्नासह प्रजासत्ताक भारताविषयीच्या अपेक्षा वेगवेगळ्या क्षेत्रात देशाचे प्रतिनिधित्त्व करणाºया निवडक मान्यवरांच्या शब्दांत...
>उत्सवात प्रत्येकाचा सहभाग हवा
अच्युत पालव। सुलेखनकार
प्रजासत्ताक दिन म्हणजे सार्वजनिक सुट्टी हा दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे. या दिवसासाठी शाळांमध्ये कार्यक्र म राबविण्याची सक्ती केली जाते. त्या दृष्टीने कार्यक्र म राबविले जातात. अनेक दिवसांपासून कार्यक्र मांची रंगीत तालीम सुरू असते. पोलीस व जवानदेखील कर्तव्य बजावत असतात. अशा महत्त्वाच्या दिवशी आपण घरी बसून झेंडावंदन पाहणे किंवा जोडून सुट्ट्या घेत बाहेर जाणे योग्य नाही. कायद्यात तरतूद करून सर्वच कार्यालये सुरू ठेवून तेथे उत्सव साजरा करावा. हा दिवस सुट्टी घेण्याचा नाही तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांना वंदन करण्याचा दिवस आहे.
>देशहितासाठी काम करा
शंकर महादेवन । गायक
देशाच्या स्वातंत्र्यासाठी वीरांनी दिलेल्या प्राणाच्या आहुतीचे महत्त्वदेखील पटवून देण्याची गरज आहे. देशासाठी काय करता येईल, याचा तरुणांनी विचार केला पाहिजे. आपल्या देशात ज्याप्रमाणे गणपती, दिवाळी, नवरात्र आणि इतर सर्व सण उत्साहात साजरे केले जातात, त्याप्रमाणे हे दोन्ही दिवस उत्सव समजून साजरे व्हायला हवेत. या दोन दिवशी आपण काय करू शकतो, याबाबत विचार केला पाहिजे. या दिवसाच्या निमित्ताने देशासाठी, पर्यावरणासाठी नक्कीच काहीतरी करू शकतो. स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, ज्येष्ठ नागरिकांना मदत करावी, लहान पण सकारात्मक गोष्टी केल्या तरीही आपल्या देशात नक्कीच बदल घडेल.
>तरुण पिढीत देशभावनेचा अभाव
विवेक मेहेत्रे। व्यंगचित्रकार
सध्याच्या १७ ते ३७ वयोगटातील पिढीला मुळात प्रजासत्ताक दिनाचे महत्त्वच समजलेले नाही. त्यामागचे गांभीर्य त्यांना नाही. या उलट इस्रायलचा स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन दिवशी त्या तेथे टीव्ही बंद केला जातो, त्यांच्याकडे प्रत्येक घरातील एक तरी सदस्य हा देशासाठी लढलेला असतो. आपल्या पूर्वजांनी काय केले हे पाहण्यासाठी प्रत्येक कुटुंब या दोन्ही दिवशी सीमारेषेवर जातात. आपल्याकडे पुढची पिढी घडविण्याचे काम चित्रपट, राजकारण, शिक्षण या क्षेत्रांवर आहे. या तिन्ही क्षेत्रांत दुर्दैवाने शैक्षणिक पात्रता आणि देशाभिमान नसलेले लोक आहेत.
>कार्यक्रमांतून प्रबोधनाची गरज
अभिराम भडकमकर । लेखक
आपण प्रजासत्ताक दिनी लोकशाही पद्धत स्वीकारली. स्वराज्यनंतर सुराज्य. प्रजासत्ताक दिन हा स्वराज्याच्या संदर्भातील दिवस आहे. प्रजासत्ताक दिनी हे अधिकाधिक अधोरेखित केले पाहिजे की, त्या संदर्भातील होणाºया कार्यक्रमांतून प्रबोधन होणे गरजेचे आहे. कारण, नुसते ध्वजारोहण कार्यक्रम घेऊन काही उपयोग नाही. आपली लोकशाही कोणत्या टप्प्यावर आहे. त्याचे महत्त्व काय आहे? हे जाणून घेणारा आणि समजावून सांगणारा दिवस असला पाहिजे. अशाप्रकारे प्रजासत्ताक दिन साजरा झाला पाहिजे. त्यानिमित्ताने संविधानामध्ये नेमके काय म्हटले आहे. तसेच संविधानामधील फारशा चर्चा होत नाहीत, त्यापण होणे गरजेचे आहे.
>प्रगतीसाठी कठोर मेहनत हवी
गौरी प्रसाद महाडिक। वीरपत्नी
अजूनही अनेकांना राज्यघटनेबद्दल माहिती नाही. ते आपले कुटुंब,
आपली नोकरी यात गुरफटलेले आहेत. ग्लोबलायझेशनमुळे जग जवळ आले आहे. मात्र, आजही मोफत या शब्दाची भुरळ लोकांना पडते आहे. स्वत:ची प्रगती हवी असेल तर कठोर परिश्रम करायला हवेत. आज शिक्षणाच्या बाबतीत महिला सक्षम होत आहेत. स्वत:च्या पायावर ती उभी राहते आहे. मात्र, महिलांसाठी असलेल्या अनेक शासनाच्या योजना तळागाळात पोहचू शकलेल्या नाहीत. तरुणांनीही राजकारणात येऊन आता बदल घडवून आणायला हवेत. नवनवीन योजना कार्यान्वित करण्यासाठी राजकारण्यांनी कायदे बनवले पाहिजेत.
>विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे लक्ष केंद्रित व्हावे
राजेंद्र शिंदे । प्राचार्य, झेव्हिअर्स महाविद्यालय
भारत हा मुळातच विविध धर्म, समाज यांनी नटला असून आपल्या बहुभाषिक संस्कृती आणि संविधानाने आपल्या प्रजासत्ताकाला बळकटी दिली आहे, त्यामुळे भारत अधिक प्रगत देश म्हणून जगासमोर येत आहे. या सगळ्यांत विद्यार्थी हा घटक अत्यंत महत्त्वाचा असून आपण सगळ्यानीच विद्यार्थ्यांची शैक्षणिक आणि सामाजिक प्रगती कशी होईल, यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञानासोबतच विद्यार्थ्यांच्या इतर क्षेत्रातील कामगिरीला आणि गुणांना अधिक प्रोत्साहन मिळायला हवे. या प्रजासत्ताकाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी, संविधानिक हक्क आणि जबाबदारी जपायला हवी, असे वाटते.
>सामाजिक भान जपायला हवे
डॉ. महेश बेडेकर । पर्यावरणप्रेमी
प्रजासत्ताक दिनी नागरिकांना शुभेच्छा देणे महत्त्वाचे आहे. हल्ली व्हॉट्स अॅपवर देशप्रेम, देशभावना जास्त दिसून येते. देशप्रेम दाखविण्यासाठी सीमेवर जाऊन लढा, असे अजिबात अपेक्षित नाही, ते कोणाला शक्य नाही, त्यासाठी एक ‘माइंड सेट’ लागतो. सामाजिक भान प्रत्येक नागरिकाने ठेवले तर ते एकप्रकारे देशप्रेमच असेल, ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळणे, स्वच्छतेकडे लक्ष देणे, रस्त्यात न थुंकणे, हेल्मेट घालणे इतके साधे नियम आहेत; पण हेच नियम जेव्हा मोडल्याचे मी पाहतो, तेव्हा माझ्या मनाला त्रास होतो. ९९ टक्के नागरिक साधे नियम पाळत नसल्याचे पाहायला मिळते.
>शेतकरी जगवा देश वाचवा
अतिक हुसैन राजा । राष्ट्रपती पदक विजेते
देशासाठी सध्याचा महत्त्वपूर्ण कालावधी, चांगल्याप्रकारे पुढे गेल्यास जागतिक शक्ती म्हणून पुढे येऊ शकतो. पंतप्रधानांच्या ‘सबका साथ , सबका विकास’ या घोषणेची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. सर्वसामान्य नागरिक, राजकारणी, न्यायालयीन क्षेत्रासहित सर्व क्षेत्राने एकत्रितपणे सहकार्य करण्याची गरज आहे. भारताला चीन, अमेरिका सारख्या देशांसोबत स्पर्धा करून पुढे जाण्यासाठी देशातील सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. विशेषत्वाने शेतकºयांसाठी मदतीचा हात देणे गरजेचे आहे. कारण, शेतकरी जगला व पुढे गेला तर देश जगेल व पुढे जाईल ही भावना प्रत्येकाच्या मनात जागवण्याची गरज आहे.
>संकल्प करू जैवविविधतेच्या संवर्धनाचा
प्रेमसागर मेस्त्री । पक्षी संशोधक
गेल्याच आठवड्यात ‘रशिया रॅप्टर्स रिसर्च कॉन्झर्वेशन नेटवर्क’ या जागतिक पातळीवरील संस्थेच्या टिमने चिरगांव-म्हसळा येथे येऊन सिस्केप गिधाड संरक्षण व संवर्धन केंद्रासोबत आंतरराष्ट्रीय करार केला. देशातील अस्तंगत होणाºया गिधाडांच्या प्रजातींचे संरक्षण व संवर्धन करणे हे पर्यावरणीय साखळीतील गरजेचे काम होते. जैवविविधतेचे संवर्धन करण्याकरिता विविध प्रजातींचे संवेदनशील अधिवास संरक्षित करण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केले. अशा प्रकारे प्रजासत्ताक दिनी संकल्प करून आपल्या तरुण पिढीने पर्यावरण संरक्षण व संवर्धनाकरिता वर्षभर काम केले तर ती मोठी गोष्ट ठरेल.
>शब्दभ्रम कला भारतात रुजायला हवी
रामदास पाध्ये । आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शब्दभ्रमकार
भारतामध्ये तसेच परदेशामध्येही बोलक्या बाहुल्या आणि शब्दभ्रम या कलेमुळे नावाजले गेलेले हाडाचे कलाकार आहेत. जेव्हा-जेव्हा जगभरात कार्यक्रमानिमित्त आणि पपेट फेस्टिव्हलमध्ये जायला मिळते, तेव्हा लक्षात येते की जगभरातील शब्दभ्रमकारांना भारतीय मातीत तयार झालेल्या अस्सल बोलक्या बाहुल्यांना पाहण्याची उत्सुकता आहे. आपल्या भारतात ही कला रुजली पाहिजे, अशी माझी खूप इच्छा आहे. भारतात खूप गुणी शब्दभ्रमकार आहेत, त्यांना एकत्र आणण्याची खूप गरज आहे. शब्दभ्रमकार ही कला जपली पाहिजे. कारण जगाच्या पाठीवर या कलेला खरेच लोकमान्यता आहे आणि हीच लोकमान्यता भारतातही मिळतेय.
>झुंड माजविणाºयांना सद्बुद्धी देवो
विजू माने । दिग्दर्शक
विशिष्ट जात, विशिष्ट देव यावरून धार्मिक, जातीय भावना दुखवण्याचे प्रकार घडत आहेत. या प्रजासत्ताक दिनी झुंडशाही माजविणाºयांना सद्बुद्धी देवो, या झुंडशाहीला संविधानाचे महत्त्व कळावे, आपण प्रजासत्ताक दिन का साजरा करतो, या बाबत जनजागृती व्हावी. मुळात ५० टक्के नागरिकांना या दिवसाचे महत्त्व माहीत नाही. या दिवशी सुटी देण्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी, कट्ट्याकट्ट्यांवर, शाळा - कॉलेजमध्ये संविधानावर व्याख्याने व्हावीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानासाठी असलेले योगदान कळण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम व्हावेत.
कृतीतून दिसू दे देशप्रेम
अधिक कदम । संस्थापक, बॉर्डर लेस फाउंडेशन
अजून आपला देश एक झालेला नाही. काही प्रदेशात तर अजूनसुद्धा झेंडावंदन होत नाही. २६ जानेवारी आणि १५ आॅगस्ट आपण का साजरा करतो. सेलिब्रेशन कशासाठी करतो ? ब्रिटिशांना हिणविण्यासाठी करत असलो, तर ते चुकीचे आहे. आपल्या देशाला एकत्र करण्यासाठी आधी आपण देशावर प्रेम करायला पाहिजे. देशाभिमान असायला पाहिजे. सामान्यत: आपण पाहिले, तर देशातील नागरिक कुठेही कचरा टाकतात. यासारख्या अनेक नियमांचे उल्लंघन केले जाते. देशावर खरे प्रेम असेल तर ते आपल्या प्रत्येक कृतीतून दिसले पाहिजे.
>कायद्याचा मान राखा
अरविंद इनामदार । निवृत्त पोलीस महासंचालक
देशाची प्रगती होत आहे, रस्त्यांचे जाळे वाढत आहे, तंत्रज्ञान वाढतेय. नवनवीन योजना घराघरांत पोहचल्या, त्यातही खेळांमध्ये घेतलेली उभारी कौतुकास्पद आहे. देशाची प्रगती होते ही चांगली बाब असली, तरी लोकसंख्येचा विचार होणे गरजेचे आहे. आजही कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित नाही. पोलिसांवर हल्ले होताहेत. ही बाब अराजकतेकडे नेणारी आहे. त्यावर आवर बसायला हवा. कायद्याचा मान सर्वांनीच ठेवायला हवा. त्यात येणारा काळ निवडणुकींचा आहे. राजकीय नेत्यांची चितावणीखोर भाषणे डोके वर काढणार, त्यामुळे चर्चेतून मार्ग निघायला हवा.
>लोकशाहीच्या गळ्यातील कंठमणी
फादर फ्रान्सीस दिब्रीटो । साहित्यिक
संविधान हा आपल्या देशाचा प्राण असून, लोकशाहीच्या गळ्यातील कंठमणी आहे. स्वातंत्र्यानंतर प्रजासत्ताक मिळून लोकांचे राज्य आले. त्यासाठी अनेकांनी त्याग व बलिदान दिले. गेल्या काही वर्षांत देशाने उत्तुंग भरारी घेतली आहे. लोकसंख्येत वाढ होत असताना उद्योगधंदे व गुंतवणुकीतही वाढ होताना दिसत आहे. प्रजासत्ताक म्हणजे जनतेने जनतेसाठी चालवलेले राज्य, असे असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्यही तितकेच मोलाचे आहे. लोकप्रतिनिधींनी लोकसभेत उपस्थित राहून लोकोपयोगी कायदे केले पाहिजेत. मात्र, ते होताना दिसत नाही. हा एक प्रकारचा राष्ट्रद्रोह आहे.
>कर्तव्यांचीही जाणीव असू द्या!
अफरोज शहा । स्वच्छता दूत
आजच्या दिवशी आपल्या देशात भारतीय संविधान लागू झाले, त्यामुळे या दिनाचे महत्त्व खूप मोठे आहे. संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार दिले आहेत. हे अधिकार मिळाले नाही, तर त्यासाठी नागरिक झगडत असतो. हे बरोबरच आहे. मात्र, आपल्याला संविधानाने अधिकारासह मूलभूत कर्तव्ये दिली आहेत. याचे पालन देशातील प्रत्येक नागरिकाने केले पाहिजे. पर्यावरण संरक्षण व संवर्र्धनासाठी पावले उचलली पाहिजेत. कचरा साफसफाई करणे, उचलणे यावरच पर्यावरण संवर्धन सीमित राहता कामा नये. निसर्गाबद्दल जागृती ही प्रत्येकाच्या मनात उतरविणे आवश्यक आहे. देशप्रेम आहे, असे बोलून दाखविण्यापेक्षा चांगल्या कृतीतून दाखवा.
>कायद्याचे राज्य स्थापण्यात यशस्वी
न्या. विद्याधर कानडे । निवृत्त न्यायाधीश
अन्य देशांच्या तुलनेत आपला देश नव्याने जन्माला आलेले राष्ट्र आहे. आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल आहे, यात वाद नाही. आपण अन्य देशांप्रमाणे प्रगती केली नसेलही; मात्र कायद्याचे राज्य स्थापण्यात आपण यशस्वी झालो आहोत आणि त्यामुळे लोकशाहीला आणखी बळकटी मिळाली आहे. गेल्या ६९ वर्षांत आपण ज्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत, त्यामुळे पुढील १० वर्षांत आपल्या देशाचा विकास होणे साहाजिक आहे. सध्या देश ज्या संकटांतून जात आहे, त्या संकटांतून सर्व मोठे देश गेले आहेत. त्यामुळे हेही दिवस जातील.
> भारतीय म्हणून अभिमान वाटतो
विश्वनाथ पाटील । राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते
आपल्या देशाला प्रजासत्ताक होऊन सात दशके होत आहेत. अनेक संकटे, आव्हान यांवर मात करणाऱ्या आपल्या देशाकडे संपूर्ण विश्व तरुणांचा देश म्हणून पाहत आहे. शिक्षण क्षेत्रात ‘आॅपरेशन ब्लॅकबोर्ड’ ते ‘डिजिटल स्कूल’ हा प्रवास सुखावणारा आहे. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीमुळे लोकल टू ग्लोबल निमिषार्ध्वात पोहोचणारा भारतीय म्हणून घ्यायला नक्कीच अभिमान वाटतो; परंतु वाढती लोकसंख्या, शिक्षण क्षेत्रात हवा असलेला एकसंधपणा, प्रांतीयता व शेवटच्या घटकापर्यंत मूलभूत गरजांची परिपूर्ती या बाबींवर विनाविलंब करावयाची उपाययोजना यावर सुधारणेला खूपच वाव आहे.
>घटनेकडे दुर्लक्ष होऊ नये
अशोक मुळे । प्रकाशक
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान हे संपूर्ण जगात मान्यता पावलेले आहे. संविधानाची समज सर्वोच्च न्यायालय वेळोवेळी करून देत असून, सर्वसामान्य माणसांसाठी ही आशादायक बाब आहे. न्यायालयही या बाबत संवेदनशील आहे. सत्तेवरील पक्षांनीही संविधानाप्रमाणे वागायला हवे. गटातटाच्या राजकारणात घटनेकडे दुर्लक्ष होत आहे. संकुचित राजकारण जोर धरत आहे. सरकारचेही काही निर्णय हे धनाढ्यांना बलवान तर गरिबांना कर्जबाजारी बनवत आहेत. प्रजासत्ताक दिन हा घटना समितीचे स्मरण करून कायद्याचे राज्य आचरणात कसे आणता येईल याचा विचार करण्याचा दिवस आहे.
>अजूनही नीट अर्थ उमगलेला नाही
सच्चिदानंद शेवडे । लेखक, प्रवचनकार
इंग्रजांच्या न्यायालयात प्रथम ‘प्रजासत्ताक’ हा शब्द आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी उच्चारला. हिंदी लोकांचे प्रजासत्ताक येथे स्थापन व्हावे, त्याकरिता लहानसहान बंड घडवून आणून देश स्वातंत्र्य व्हावा, असा त्यांच्या बोलण्याचा मथितार्थ होता. त्यानंतर प्रजासत्ताक हा शब्द आपल्याकडे रूढ झाला. लोकशाहीप्रमाणे नागरिकांनी एकमेकांच्या मतांचा आदर करणे हे गृहीत आहे. दुदैवाने आज तसे होत नाही. लहान गोष्टीवरून हाणामारी होतात. द्वेष फैलावला जात आहे. त्यावरून खºया अर्थाने प्रजासत्ताक म्हणजे काय हे आपल्याला ६० वर्षांत तरी नीट समजलेले आहे, असे वाटत नाही.
>स्त्रियांना कर्तृत्त्व, नेतृत्वाची संधी मिळावी
डॉ. स्नेहलता देशमुख । माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
आज स्त्रियांच्या समानतेसाठी स्वावलंबनाबरोबरच आर्थिक समानतासुद्धा मिळण्याची गरज आहे. स्त्रियांना मातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व दाखविण्याची संधी मिळणे हीच या प्रजासत्ताकाची आदर्श संकल्पना असायला हवी आणि ती प्रत्यक्षातही यायला हवी. आज तंत्रज्ञानात आपण बरीच प्रगती केली आहे. त्याचा आधार घेत महिलांना वर्क फॉर्म होम करण्याची संधी आणि मुभा दोन्ही उपलब्ध करून दिल्यास ही संकल्पना सत्यात यायला हातभार लागेल. यामुळे त्यांना कर्तृत्व सिद्ध करता येईल, सोबतच मुलांना चांगले संस्कार देऊन मातृत्वाचे कर्तव्यही पार पाडता येणे शक्य होईल.
>आजची परिस्थिती पाहून नैराश्य आले
भाई वैद्य। ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी
आम्ही ज्या देशाचे स्वप्न पाहिले, जी लोकशाही मनात बाळगळी तिची आजच्या काळात गळचेपी सुरू आहे. गेल्या चार वर्षांमध्ये एकही चांगली योजना आमच्या आदिवासी भागामध्ये आलेली नाही. याला अच्छे दिन म्हणणार का? रोजगार नसल्याने खेडी ओस पडली आहेत. कामधंद्याच्या शोधात लोक आजूबाजूच्या शहरात ऊन-पावसाची परवा न करता राबत आहेत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची अबाळ सुरू आहे. कुपोषणही त्या आर्थिक परिस्थितीतूनच जन्माला आले आहे. मी पोर्तुगीज सत्तेविरोधात गोवा, दमणमध्ये आंदोलन केले आहे; परंतु आजची परिस्थिती पाहून नैराश्य आले आहे.
>तरुणांनी खेळावर लक्ष केंद्रित करावे
अभिलाषा म्हात्रे । अर्जुन पुरस्कार प्राप्त, कबड्डीपटू
देशाच्या संरक्षणासाठी दरवर्षी अनेक जवानांना बलिदान द्यावे लागत आहे. त्यांची नावेदेखील अनेक वेळा नागरिकांना माहितीच नसतात. प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन साजरे करताना शहीद होणाºया जवानांनाही वंदन करणे गरजेचे आहे. चित्रपटांच्या माध्यमातून दिसणारे खरे हीरो नसून देशाच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणारे आपले जवान खरे हीरो आहेत. आपल्या देशाचा झेंडा सर्वात उंचावर असावा, यासाठी खेळाडूदेखील खूप मेहनत घेतात. खेळांच्या माध्यमातूनही देशासाठी खूप काही करता येते त्यामुळे तरु णांनी खेळांच्या माध्यमातून देशाचे नेतृत्व केले पाहिजे.
>देशप्रेम जागरूक ठेवणे गरजेचे
विनय देगावकर । निवृत्त मेजर
प्रजासत्ताक दिनाला ऐतिहासिक महत्त्व आहे. ते आजच्या काळात
समजून घेणे गरजेचे आहे. २६ जानेवारीचे महत्त्व लक्षात घेऊन आपल्या ध्येयपूर्तीची जाणीव पुढील पिढ्यांना राहावी, यासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी, मसुदा समितीने बनवलेल्या भारतीय संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून सुरू झाली व खºया अर्थाने भारतात लोकशाही अस्तित्वात आली. आर्थिक, राजकीय व तंत्रज्ञानासारख्या अनेक क्षेत्रात भारताची यशस्वी घोडदौड सुरू आहे; परंतु आजही आपल्या देशात राष्ट्रगीतासाठी उभे राहावे का? हा प्रश्न पडतो. हा प्रश्न पडणे म्हणजेच देशभक्तांच्या बलिदानाचा अपमानच आहे.
प्रदूषणमुक्त प्रजासत्ताक अपेक्षित
अफजल व नुसरत खत्री । प्रथम पारितोषिक, स्वतंत्र विभाग, इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार
प्रजातंत्र म्हणजे जेथे प्रजेला स्वत:चे हक्क असतील. ज्यात प्रजेचा सहभाग असेल. प्रजासत्ताकात प्रजेने देशाशी प्रामाणिक असले पाहिजे. एका अर्थाने नियम पाळले पाहिजेत; सिग्नल पाळला पाहिजे. प्रजेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची यात मोलाची भूमिका असली पाहिजे. प्रजासत्ताक म्हणजे समाज भयमुक्त असला पाहिजे. प्रत्येक स्तरावर संवाद असला पाहिजे. पारदर्शकता पाहिजे. तरुणांच्या भाषेत बोलायचे झाल्यास ‘युझर फ्रेंडली’ वातावरण असले पाहिजे. प्रजेने चालवलेली सत्ता म्हणजे प्रजासत्ताक. स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा आणि साफसफाई अपेक्षित आहे. प्रदूषणमुक्त प्रजासत्ताक अपेक्षित आहे. प्रत्येक गोष्ट शक्य आहे. मात्र, यासाठी लोकप्रतिनिधी आणि समाज यात संवाद असला पाहिजे. स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा आणि स्वच्छ शहर हेच आपले प्रजासत्ताक आहे.
>निर्धार करू या देशाच्या प्रगतीचा!
स्नेहल राजपूत। आंतरराष्ट्रीय धावपटू
राष्टÑ ही संकल्पना प्रेरणादायी आहे. ‘सारे जहांसे अच्छा हिदोस्ता हमारा’ म्हणताना आपोआप अंगावर रोमांच उभे राहतात. आपल्या देशात ‘प्रजासत्ताक दिन’ एक राष्टÑीय सण म्हणूनच साजरा केला जातो. २६ जानेवारी याच तारखेला भारतीय संविधान लागू करण्याचे ठरविण्यात आले होते. फक्त हा दिवस सण म्हणून साजरा न करता आजच्या दिवशी प्रत्येक देशप्रेमी नागरिकाने असा निर्धार केला पाहिजे की, माझा देश सतत प्रगतिपथावर राहील यासाठी मीसुद्धा काहीतरी प्रयत्न करेन. हा माझा देश आहे आणि या देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी मीसुद्धा सतत प्रयत्न करेन, असा निर्धार करू या.
>अवकाश तंत्रज्ञानाकडे वळावे
प्रणित पाटील । शास्त्रज्ञ, नासा
जगात माहिती तंत्रज्ञान, अवकाश संशोधन याचा झपाट्याने प्रसार होत आहे. भारतामध्ये १९८० च्या दशकामध्ये औद्योगिकीकरणाला चालना मिळाली व अभियांत्रिकी शिक्षणाचा प्रसार वाढला; पण आपण अजून चार दशकांपूर्वीचे जुने अभ्यासक्रम शिकत आहोत. आपण केंद्रस्थ अभियांत्रिकीकडून व्यवहारात उपयोग होणाऱ्या अभियांत्रिकीकडे वळले पाहिजे. लवकरच आपल्या सर्वांच्या समोर एक गोष्ट येत आहे. ती म्हणजे अवकाशाचे लोकशाहीकरण व त्याच्या अनुषंगाने स्पेस पोर्ट ही नवीन संकल्पना. यामुळे तरुण पिढीने अवकाश तंत्रज्ञानाकडे वळावे व त्यामध्ये प्रगती करावी.