लोकसभेपूर्वी नाथाभाऊंची भाजपामध्ये घरवापसी होणार? रक्षा खडसेंचे सूचक विधान; म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 04:16 PM2024-02-22T16:16:18+5:302024-02-22T16:17:40+5:30
BJP MP Raksha Khadse News: एकनाथ खडसे भाजपामध्ये परतण्यासाठी प्रयत्नशील असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.
BJP MP Raksha Khadse News: गेल्या काही दिवसांपासून महायुतीत येणाऱ्या बड्या नेत्यांची संख्या वाढताना दिसत आहे. काँग्रेसचे मुंबईतील दोन मोठ्या नेत्यांनी महायुतीत येण्याचा निर्णय घेतला. यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपा प्रवेश केला. आता ते राज्यसभेवर खासदार म्हणून बिनविरोध निवडून गेले आहेत. यातच अनेक नेते भाजपासह महायुतीत येण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात असताना एकनाथ खडसे भाजपामध्ये घरवापसी होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. जागावाटप आणि उमेदवारीवर चर्चा सुरू आहेत. यातच एकनाथ खडसे यांच्या भाजपात परतण्याविषयीच्या चर्चांनी जोर धरला आहे. भाजपा खासदार आणि एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांनी याबाबत मनोगत व्यक्त केले आहे. मीडियाशी बोलताना रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशाविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर रक्षा खडसे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
लोकांची इच्छा तीच माझी इच्छा आहे
मागील अनेक दिवसांपासून हे चित्र आहे की, अन्य पक्षातील बडे नेते भाजपामध्ये येत आहेत. एकनाथ खडसे यांच्याबाबत अधिक काही सांगू शकत नाही, कारण तो वरिष्ठ पातळीवरील विषय आहे. पक्ष काय निर्णय घेतो, नाथाभाऊंचे त्यावर काय मत आहे, हे घडल्यानंतर सर्वांना समजेल. मात्र, नक्कीच एक कार्यकर्ता म्हणून बरेच लोकांचीही ही इच्छा आहे की, नाथाभाऊंनी भारतीय जनता पार्टीत येऊन पुन्हा कामाला सुरुवात केल्यास लोकांना आनंद होणार आहे. लोकांची इच्छा तीच माझी इच्छा आहे, असे मत रक्षा खडसे यांनी व्यक्त केले.
दरम्यान, एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्यासाठी फार जोर लावत आहेत, असे मला कळाले आहे. दिल्लीतून आणि राज्यातून या बातम्या माझ्यापर्यंत आल्या आहेत. मला वाटते तसे काही प्रयोजन नाही. अजूनतरी कोणीही एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये परत घ्यायचे किंवा नाही, याबद्दल मला विचारलेले नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे. कदाचित एकनाथ खडसे यांनी थेट वरुन हॉटलाईन असेल तर त्यांनी लावावी, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी दिली.