शिंदे गटाच्या आमदारांना भाजपात घेणार?; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 12:32 PM2022-10-27T12:32:07+5:302022-10-27T12:32:51+5:30

शिंदे गटातील नाराज आमदार भाजपात विलीन होणार असा दावा सामना मुखपत्रातून शिवसेना ठाकरे गटाने केला होता. त्यावर दानवेंनी हे स्पष्टीकरण दिले आहे

Will Eknath Shinde group MLAs join BJP? Big statement of Union Minister Raosaheb Danve | शिंदे गटाच्या आमदारांना भाजपात घेणार?; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचं मोठं विधान

शिंदे गटाच्या आमदारांना भाजपात घेणार?; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचं मोठं विधान

Next

मुंबई - आम्ही कुठलाही राजकीय पक्ष फोडणार नाही, कुणाचं सरकार पाडणार नाही असं २०१९ पासून आम्ही सांगतोय. मविआच्या अंतर्गत वादामुळे सरकार पडलं तर त्याचा दोष भाजपाला देता येणार नाही. शिवसेनेच्या आमदारांविरोधात पराभूत झालेल्यांना ताकद देण्याचं काम मविआतील नेत्यांनी केले. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आमदारांनी उठाव केला. शिंदे गटातील आमदारांना भाजपात घेण्याचं कारण नाही कारण आम्ही दोघे एकच आहोत. एकत्र सरकार चालवतोय असं विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी केले आहे. 

शिंदे गटातील नाराज आमदार भाजपात विलीन होणार असा दावा सामना मुखपत्रातून शिवसेना ठाकरे गटाने केला होता. त्यावर दानवेंनी हे स्पष्टीकरण दिले आहे. दानवे म्हणाले की, आम्ही सरकार चालवत आहोत. आम्हाला उर्वरित काळ पूर्ण करून त्यापुढील ५ वर्षही सरकार आणायचं आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज आहेत वैगेरे असं उद्धव ठाकरे, काँग्रेस-राष्ट्रवादीवाले म्हणणार नाहीत तोवर त्यांच्याकडे शिल्लक असणारे आमदार स्वस्थ बसणार नाहीत. कारण त्यांच्याकडील अनेक आमदार पक्षातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. आपल्याकडे असलेले पळू नयेत म्हणून ही अफवा सोडली आहे असा दावा दानवेंनी केला. 

ज्याच्याकडे संख्याबळ तो राजा
तसेच संख्याबळाचा खेळ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढली आणि त्यांच्याकडे संख्याबळ असले तर ते मुख्यमंत्री होऊ शकतात. लोकशाहीत ज्याच्याकडे संख्याबळ तो राजा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्यांच्याकडे संख्याबळ असल्याने पदावर आहेत. एकनाथ शिंदे यांना भाजपानं पाठिंबा दिल्यानं ते मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे संख्याबळाला महत्त्व आहे. कुणाच्या बोलण्यानं कुणीही मुख्यमंत्री होत नाही असं सांगत दानवेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला. 

दरम्यान, या राज्यातल्या राजकारणाचा कुणीच अंदाज लावू नका. राजकीय परिस्थिती जशी निर्माण होईल तसे वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतले जातील. जो निर्णय वरच्या पातळीवर होईल तो आम्ही पाळू. आता काँग्रेस-राष्ट्रवादीकडे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्ता नसली तरी चालेल आहे ते टिकले पाहिजे अशी भूमिका आहे. उद्धव ठाकरे हेदेखील अस्तित्व टिकवण्यासाठीच कुणाशीही युती करत आहेत असा टोलाही रावसाहेब दानवेंनी विरोधकांना लगावला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Will Eknath Shinde group MLAs join BJP? Big statement of Union Minister Raosaheb Danve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.