शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?; तुकडाबंदी कायद्यात सुधारणा होण्याची शक्यता, महसूलमंत्र्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 10:13 IST2025-02-07T10:09:01+5:302025-02-07T10:13:44+5:30
महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?; तुकडाबंदी कायद्यात सुधारणा होण्याची शक्यता, महसूलमंत्र्यांचे आदेश
Chandrashekhar Bawankule: शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तुकडा बंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्यास त्याबाबत अभ्यास करुन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाला दिले आहेत. महसूल कायद्यामध्ये कालसुसंगत सुधारणा करण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी त्यांनी याबाबत तपासणी करुन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "महसूल विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून शेतीशी संबंधित कायद्यांमध्ये सुधारणा करण्याबाबत विचार करण्यात येत आहे. जमीन महसूल कायद्यातील नियमानुसार नावांमध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध आहे. याबाबतची कार्यवाही विनाविलंब करावी," असे निर्देश त्यांनी दिले.
दरम्यान, डीपी रोडची मोजणी करताना कमी फी आकारण्यासंदर्भात नगररचना विभागाचा अभिप्राय घेण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याची सूचनाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. अभिलेख कागदपत्रे महाभूमी या संकेतस्थळावर उपलब्ध असून सर्व कागदपत्रांचे स्कॅनिंग करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.