नवाब मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचं ठरलं, काँग्रेसचीही साथ; आता शिवसेना काय करणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 07:42 PM2022-02-23T19:42:04+5:302022-02-23T19:44:29+5:30
काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका निश्चित; शिवसेनेच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचलनालयानं अटक केली आहे. ईडीनं पहाटे मलिक यांना घरातून ताब्यात घेतलं. आठ तास त्यांची चौकशी झाली. त्यानंतर ईडीनं त्यांना अटक केली. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालं आहे.
नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संवाद साधला. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं दोघांमध्ये चर्चा झाली. आता वळसे पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर पोहोचले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्यासोबत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरातदेखील वर्षावर पोहोचले आहेत. वर्षावर रवाना होण्यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. केंद्रीय तपास यंत्रणांकडून येणारा दबाव, त्यांच्या कारवाया यावर बैठकीत चर्चा झाली. शेवटपर्यंत एकत्र राहून लढा द्यायचा, अशी भूमिका दोन्ही पक्षाच्या मंत्र्यांनी घेतली. यानंतर आता शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.
तत्पूर्वी संध्याकाळी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ मंत्र्यांची बैठक सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दालनात बैठक झाली. मंत्रालयात झालेल्या बैठकीला दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, राजेश टोपे उपस्थित होते. मलिक यांच्याविरोधात झालेली कारवाई चुकीची असल्यानं राजीनाम्याचा प्रश्नच येत नसल्याची राष्ट्रवादीची भूमिका असल्याची माहिती सुत्रांनी दिली.