सहकारी पक्षांना सोबत घेऊन लढणार - शरद पवार
By सचिन धर्मापुरीकर | Published: January 5, 2024 09:18 AM2024-01-05T09:18:10+5:302024-01-05T09:19:05+5:30
एकट्याने नाही, तर सहकारी पक्षांना सोबत घेऊन येणाऱ्या निवडणुकांना सामोरे जायचे आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
प्रमोद आहेर/सचिन धर्मापुरीकर -
शिर्डी : मोदी सरकारला हटविण्यासाठी ठरावीक कार्यक्रम इंडिया आघाडीच्या माध्यमातून राबवावे लागणार आहेत. वाढती बेरोजगारी, महागाई, आर्थिक विषमता, खासगीकरण असे मुद्दे घेऊन योग्य असे धोरण ठरविले जाणार आहे. एकट्याने नाही, तर सहकारी पक्षांना सोबत घेऊन येणाऱ्या निवडणुकांना सामोरे जायचे आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘ज्योत निष्ठेची, लोकशाहीच्या संरक्षणाची’ या दोन दिवसांच्या शिबिराचा गुरुवारी शिर्डीत समारोप झाला. त्यावेळी पवार बोलत होते. महाराष्ट्रातील आव्हानांचा अभ्यास केला असता जनमानसातून पर्याय दिला पाहिजे, यावर आमचे मत पक्के झाले आहे. नक्कीच त्यास जनतेचा पाठिंबा मिळेल. त्या कामासाठी तुम्ही तयार राहा, असे आवाहनही त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेला महत्त्व देण्याचे काम देशात सुरू आहे. हिंदुत्वावर आधारित फॅसिझम त्यांना आणायचा आहे. त्यासाठी त्यांनी पाच कलमी कार्यक्रम हातात घेतला आहे.
मनुवादी वर्चस्ववाद वाढविला जातोय
खासगीकरण, नफेखोरीला प्राेत्साहन, मुस्लीम समाजाविरुद्ध द्वेष वाढवणे, स्वायत्त संस्थांवर कब्जा ठेवणे, मनुवादी वर्चस्ववाद वाढविणे, पाकिस्तानविरोधी आक्रमकता दाखविणे, अशा मुद्यांतून भारतीय जनता पक्ष जनतेसमोर वेगळे वातावरण तयार करीत आहे, असेही शरद पवार म्हणाले.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सेवा, सन्मान व स्वाभिमान ही त्रिसूत्री घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहोत.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रामाच्या मुद्यात अडकू नका, जनतेचे प्रश्न सोडवा, सरकारच्या उणिवा जनतेसमोर आणा, असे आवाहन केले.
वंचित बहुजन आघाडीला सोबत घेणार
- वंचित बहुजन आघाडीशी आमची चर्चा सुरू आहे.
- प्रकाश आंबेडकर यांनाही आपण इंडियामध्ये सामील करून घेऊ, असेही शरद पवार यांनी भाषणात स्पष्ट केले.