"फेक नरेटिव्ह करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार"; देवेंद्र फडणवीसांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 12:55 PM2024-07-01T12:55:14+5:302024-07-01T12:57:38+5:30
Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेक नरेटिव्ह करणाऱ्यांविरोधात आता गुन्हा दाखल करणार असल्याची घोषणा केली आहे.
Maharashtra Aassambly Session : लोकसभा निवडणुकीपासून राज्यात फेक नरेटिव्ह याचा अनेकदा उल्लेख करण्यात आला होता. राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही फेक नरेटिव्ह मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळालं. पुण्यातील एक वेबसाईट राज्यात फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. फेक नरेटिव्ह करणाऱ्यांविरोधात आता गुन्हा दाखल करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आमदार आशिष शेलार आणि भास्कर जाधव यांच्या प्रश्नाना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान आहे.
पेपरफुटी प्रकरणावरुन चर्चा सुरु असताना आमदार भास्कर जाधव यांनी राज्यातील पेपफुटीच्या प्रकरणांची यादी वाचून दाखवली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना भास्कर जाधव यांनी फेक नरेटिव्ह मांडल्याचे म्हटलं. भास्कर जाधव यांनी वाचून दाखवलेले कुठलेही घोटाळे झालेले नाहीत. पुण्यातील एका वेबसाईटने हा मेसेज सगळ्यात आधी व्हायरल केला. ज्यांनी हा फेक नरेटिव्ह तयार केला आता मी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे, देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"खोटं नरेटिव्ह पसरवणाऱ्यांकडून राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. राज्यातल्या तरुणांमध्ये गैरविश्वास निर्माण करणे, एक लाख नोकऱ्या मिळाल्यानंतरही फेक नरेटिव्ह पसरवणे आणि यासाठी संघटित गुन्हेगारी काम केले जात असल्याची शंका महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये आहे. त्यामुळे फेक नरेटिव्ह निर्माण करणे आणि परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या यशावर विर्जन टाकणे असे संघटित प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करणार का आणि राज्यात यासाठी कायदा आणणार का," असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला होता.
त्यावर उत्तर देताना याच विधानसभा अधिवेशनात कायदा आणणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. "अभिमन्यू पवार यांच्याबरोबर जे शिष्टमंडळ आलं होतं, त्या शिष्टमंडळाला आश्वासन दिलं होतं की कायदा आणू. मुख्यंत्र्यांनी यासाठी मागणी मान्य करुन आदेश लागू केले आहेत. याच अधिवेशनात आपण कायदा आणणार आहोत," असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.