पटो न पटो, आदेश पाळवाच लागेल! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर MIMचे जलील स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 09:42 PM2022-05-01T21:42:42+5:302022-05-01T21:44:37+5:30
उत्तर आम्हीही देऊ शकतो, पण...; राज यांच्या इशाऱ्यानंतर एमआयएमची भूमिका
औरंगाबाद: मशिदीवरील भोंगे हा धार्मिक विषय नाही. तो सामाजिक आहे. मात्र ज्याला कोणाला हा धार्मिक विषय वाटत असेल, त्यांना मग आम्ही धर्मानेचं उत्तर देऊ. ४ मेपासून कोणाचंही ऐकून घेणार नाही. मशिदीचे भोंगे सुरू झाले की त्यांच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावणारच, असा थेट इशारा मनसे प्रमुख राज ठाकरेंनी दिला. ते औरंगाबादच्या सभेत बोलत होते. यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
मी चुकीच्या गोष्टींचं समर्थन करणार नाही. प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिला आहे. तो आदेश पटो न पटो, पाळवाच लागेल, अशा शब्दांत जलील यांनी पक्षाची भूमिका मांडली. राज यांच्या इशाऱ्या मुस्लिम समाज कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, त्याची गरज पण नाही, असं जलील म्हणाले.
राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देताना पोलिसांनी अनेक अटी घातल्या. समाजात तेढ निर्माण करणारी विधानं करायची नाहीत, लाऊडस्पीकरचा आवाज कमी ठेवायचा, अशा अनेक अटी होत्या. मात्र राज यांनी सगळ्याच अटींचं उल्लंघन केलं. त्यांच्यावर पोलीस काय कारवाई करणार, असा सवाल जलील यांनी उपस्थित केला. आम्ही अशी विधानं केली असती, तर आमच्याविरोधात लगेच गुन्हे दाखल झाले असते, मग राज यांना तोच न्याय का नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला.
राज यांना त्यांच्याच भाषेत आम्हीदेखील उत्तर देऊ शकतो. पण आम्ही तसं करणार नाही. मात्र मी म्हणतो तेच करा, असं होणार नाही. कारण देशात हुकूमशाही नाही, लोकशाही आहे, असं जलील म्हणाले. राज ठाकरे भाजपच्या इशाऱ्यावर बोलत आहेत. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. त्यांच्यावर पोलिसांनी योग्य कारवाई करावी, अशी मागणी जलील यांनी केली.