दिव्यांगांच्या सर्व मागण्यांची पूर्तता करणार
By admin | Published: March 28, 2016 01:51 AM2016-03-28T01:51:28+5:302016-03-28T01:51:28+5:30
सामाजिक न्याय विभागाअंतर्गत दिव्यांग व्यक्ती आतापर्यंत कायम दुर्लक्षित राहिल्या होत्या. परंतु भाजपा सरकार दिव्यांगांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राज्य शासनाचे अपंग धोरण
नागपूर : सामाजिक न्याय विभागाअंतर्गत दिव्यांग व्यक्ती आतापर्यंत कायम दुर्लक्षित राहिल्या होत्या. परंतु भाजपा सरकार दिव्यांगांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राज्य शासनाचे अपंग धोरण जवळजवळ तयार झाले आहे. त्यात दिव्यांगांच्या सर्व मागण्यांची पूर्तता करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहातील तिसऱ्या राज्यस्तरीय दिव्यांग साहित्य, कला व उद्योजकता संमेलनात दिव्यांग उद्योगभूषण पुरस्कारांचे वितरण झाले. एक हजार अपंगांना कर्जाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
गेल्या सव्वा वर्षात राज्य शासनाने दिव्यांगांसाठी २७ शासन निर्णय निर्गमित केले आहेत. अपंग धोरणाला अंतिम स्वरूप देण्याअगोदर विविध क्षेत्रांत कर्तृत्व सिद्ध केलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या अपेक्षा जाणून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सामाजिक न्यायमंत्र्यांना त्यादृष्टीने सूचना करण्यात आली होती व ते काम वेगात सुरू आहे. धोरण लवकरच तयार होईल व त्याला मान्यतादेखील मिळवून देऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले. शासकीय कार्यालयांमध्ये दिव्यांग सहजपणे येऊ शकले पाहिजे, अशी सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येईल. शिवाय केंद्र शासनाच्या सुगम्य भारत योजनेअंतर्गतदेखील विविध प्रकल्प राबविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
विविध संस्थांमध्ये दिव्यांगांना प्रतिनिधित्व मिळण्याची मागणी होऊ लागली आहे. त्यावर सरकार सकारात्मक विचार करीत असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. संमेलनाध्यक्ष डॉ. विनोद आसुदानी यांनी दिव्यांगांच्या मनातील वेदना बोलून दाखविल्या. दिव्यांग व्यक्तींना आजदेखील समाजात हवा तो सन्मान मिळत नाही. त्यांना कुणाची दया नको, तर स्वत:ला सिद्ध करण्याची संधी हवी असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
१६ व्यक्तींचा गौरव : जयसिंग चव्हाण, डॉ. रविंद्र नांदेडकर, नसिमा हुरजूक, भावेश भाटिया, बंदे नवाज नदाफ, अमोल वाळके, राजेश खडके, दीपक सोनी, सुनील ठाकरे, बिरजू चौधरी, किशोर नेवे, भास्कर हिवराळे, अशोक भोईर, माधुरी भालेराव, मेघा काळे, अशोक मुन्ने या १६ उद्योगपतींचा पुरस्काराने गौरव करण्यात आला.