नारायण राणेंचे 'ते' स्वप्नही पूर्ण करू; दीपक केसरकरांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 12:37 PM2019-03-05T12:37:49+5:302019-03-05T13:15:07+5:30
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागरी विमानोड्डान मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले.
कुडाळ : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागरी विमानोड्डान मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी गृह राज्य मंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांचे नाव न घेताच 'आम्ही नुसती उद्घाटने करत नाही तर काम करतो', असा टोला लगावला आहे. महत्वाचे म्हणजे या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री नारायण राणेही उपस्थित होते.
सिंधुदुर्ग चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महादेव जानकर, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, खासदार विनायक राउत उपस्थित होते.
यावेळी नारायण राणे यांनी नाणार प्रकल्प रद् केल्याबद्दल मुख्यमंत्र्याचे आभार मानले. तसेच कोकणचे कोकणपण टीकू दे; कोकणात प्रदूषणकरी प्रकल्प नको, अशी मागणीही केली. यानंतर दीपक केसरकर यांनी आम्ही नुसती उद्घाटने करत नाही, तर काम करतो. जिल्हयात मोठ्या प्रमाणात निधी आण्यात मुख्यमंत्र्याचा वाटा असल्याचे सांगितले. तसेच सी वर्ल्ड प्रकल्प पुढील दीड वर्षांत पूर्ण करून राणेंचेही स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
राज्याचे मंत्री महादेव जानकर यांनी पुढील दोन वर्षांत भारतात मत्स्य विभाग तीन नंबरला आणणार असल्याची घोषणा केली. खेकडा नर्सरी प्रकल्प पहिला असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी कालच शिवसेना भाजपवर चिपी विमानतळावरून टीका केली होती. चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन होत नाही, तर फक्त इमारतीचे उद्घाटन होत आहे. चिपी येथे विमान केव्हा उडेल याचा कोणताही थांगपत्ता नाही, अशी खिल्लीही उडविली होती. तसेच शिवसेना-भाजप मिळून जनतेची फवणूकही करत असल्याचा आरोप केला होता.
विमानतळाची अजून बरीच कामे बाकी आहेत. उद्या फक्त टर्मिनल इमारतीचे उद्घाटन होत आहे. माझ्या कारकीर्दीत विमानतळाच्या कामाला सुरुवात झाली होती. प्रत्यक्ष विमान कधी उडणार, अजून कसली कसली उद्घाटने करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.