पंचनामे अंतिम टप्प्यात; शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; विजय वडेट्टीवारांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2020 02:28 PM2020-10-18T14:28:09+5:302020-10-18T14:28:40+5:30
विजय वडेट्टीवारांचा लातूर दौरा; नुकसानीची पाहणी करुन ऐकून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा
जळकोट (जि. लातूर): लातूर जिल्ह्यासह मराठवाडा आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टीने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे अंतिम टप्प्यात आहेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करू. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना दिले.
जळकोट येथील नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जळकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मन्मथप्पा किडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगमेश्वर टाले, जि.प.चे गटनेते संतोष तिडके, अभय साळुंके, बाजार समितीचे संचालक बाबुराव जाधव, सत्यवान पाटील दळवे, मारुती पांडे, गजानन दळवे, बालाजी ठाकूर, प्रा. शाम डावळे, दस्तगीर शेख, नगरसेवक महेश शेट्टे, संग्राम नामवाड, सरपंच मंगेश गोरे, मुखेडचे माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, उपसभापती सुभाष पाटील, चेअरमन अशोक डांगे, शंकर शेट्टी उपस्थित होते.
मंत्री वडेट्टीवार म्हणाले, राज्य शासनाच्या वतीने आम्ही पाहणी दौरे करत आहोत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. शासनाच्या कॅबिनेटमध्ये नुकसानीची परिस्थिती सादर करुन जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करू.
शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी
प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी तालुक्यातील नुकसानीचा आढावा सादर केला. राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बिकट असून पीकविमा कंपनी, राज्य शासनाच्या वतीने अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आम्ही मदत करू. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन असल्याचे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.