...तर राजकारण सोडून देईन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 05:35 AM2019-02-25T05:35:23+5:302019-02-25T05:35:37+5:30
जितेंद्र आव्हाड : संघाला कायद्याच्या चौकटीत आणण्याचा मसुदा आंबेडकरांनी द्यावा; त्यावर आघाडीच्या नेत्यांच्या सह्या मी घेतो
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कायद्याच्या चौकटीत कसे आणायचे, याबाबतचा मसुदा प्रकाश आंबेडकर यांनी द्यावा. त्यावर महाराष्ट्रातील आघाडीच्या सर्व नेत्यांच्या सह्या आणण्याची जबाबदारी मी घेतो. तुम्ही दिलेल्या मसुद्यावर जर सह्या झाल्या नाहीत तर मी राजकारण सोडून देईन, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी दिला.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीने संघाला कायद्याच्या चौकटीत बसविण्याचे लेखी आश्वासन दिल्यास आपण महाआघाडीत सामील होऊ. त्यासाठी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहण्याची आपली तयारी असल्याचे विधान भारिप बहुजन संघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी शिवाजी पार्कवरील सभेत बोलताना केले होते. यावर प्रतिक्रिया देताना आव्हाड म्हणाले की, भाजपाविरोधात महाआघाडी व्हायला हवी. प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. त्यांनीच आता संघाला कायद्याच्या, संविधानाच्या चौकटीत बसविण्याचा मसुदा तयार करावा.
या मसुद्यावर राज्यातील आघाडीच्या सर्व नेत्यांच्या सह्या आणण्याची जबाबदारी मी घेतो. परंतु आघाडीत बिघाडी होईल अशी भूमिका घेऊ नये, असे आव्हाड म्हणाले.
ओवेसींचे आकर्षण संपले!
भारिप आणि एमआयएमच्या आघाडीबाबत आव्हाड म्हणाले की, शिवाजी पार्क येथील वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यात मुस्लीम समाज नव्हता. मुस्लीम समाजाची अनुपस्थिती म्हणजे असदुद्दीन ओवेसी यांचे आकर्षण संपल्याचे निदर्शक आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी याचा पुन्हा एकदा विचार करावा आणि भाजपाविरोधात महाआघाडीत सामील व्हावे, असे आवाहनही आव्हाड यांनी केले.