गोळवलकरांच्या पक्षात गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती चालेल का? केसरकरांचा सवाल, राणेंवर जोरदार टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 08:03 PM2017-09-24T20:03:57+5:302017-09-24T20:04:39+5:30
प्राप्तिकर विभागात शिपाई असलेली व्यक्ती 20 वर्षांत उद्योगपती धीरूभाई अंबानींच्या खालोखाल बंगला कसा काय बांधू शकतो? एवढी संपत्ती आली कुठून? असा सवाल राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत केला. गोळवलकरांच्या पक्षात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला घेताना भाजपाने विचार करावा, असा सल्ला देतानाच राणेंच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात सिंधुदुर्गात रान उठवले.
सावंतवाडी, दि. 24 - प्राप्तिकर विभागात शिपाई असलेली व्यक्ती 20 वर्षांत उद्योगपती धीरूभाई अंबानींच्या खालोखाल बंगला कसा काय बांधू शकतो? एवढी संपत्ती आली कुठून? असा सवाल राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत केला. गोळवलकरांच्या पक्षात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला घेताना भाजपाने विचार करावा, असा सल्ला देतानाच राणेंच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात सिंधुदुर्गात रान उठवले. आता महाराष्ट्रात उठवणार, असा इशाराही मंत्री केसरकर यांनी दिला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री केसरकर हे सावंतवाडीत आले होते. यावेळी त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. मंत्री केसरकर म्हणाले, समर्थ विकास पॅनलच्या नावाखाली निवडणूक लढवणा-या राणे यांनी याच नावाने पक्ष काढावा आणि निवडणूक लढवाव्यात. म्हणजे कोणाची ताकद किती आहे ती कळेल. पैशाच्या आणि जाणार त्या पक्षाच्या जिवावर आमदार फोडणार म्हणणे सोपे असते, पण आपल्या ताकदीवर किती आमदार निवडून आणणार ते पहिल्यांदा सांगा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. भाजपा हा पक्ष साधन संस्कृती मानणारा आहे. तसेच या पक्षाला गोळवलकर, हेडगेवार या महान व्यक्तींचा विचार आहे. ते कोकणचे सुपुत्रच होते. त्या पक्षात गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसे कशी काय चालू शकतात, असा सवाल करीत आम्ही आमचा विचार जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्गच्या जनतेने दहशतीविरोधात लढा दिला आहे. आता पूर्ण राज्याचा दौरा करणार असून, या प्रवृत्तीविरोधात रान उठविणार, असे त्यांनी सांगितले. माझ्या दौ-याची सुरुवात जालना येथून झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राणे ही प्रवृत्ती आहे. कणकवली येथे श्रीधर नाईक यांच्या खून खटल्याचा निकाल जरी लागला असला, तरी राणे हे राज्यात त्यावेळी एक प्रमुख मंत्री असल्याने यावर वरच्या न्यायालयात अपील झाले नाही. अन्यथा वेगळा निकाल दिसला असता, असेही त्यांनी सांगितले. हा इतिहास आहे. तो येथील जनता विसरली नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राणे हे प्राप्तिकर विभागात पहिले शिपाई होते. त्यानंतर दहावीची परीक्षा देऊन लिपिक झाले. पण आज त्यांनी मुंबईत उद्योगपती धीरूभाई अंबानीच्या खालोखाल बंगला बांधला हे कसे काय शक्य झाले? त्यांच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून, असा सवाल करीत कोणत्याही ठेकेदाराकडून जरूर प्रतिज्ञापत्र लिहून घ्यावे. काही ठेकेदार हे त्यांचेच आहेत. त्यांच्यामुळेच ही आजची जिल्ह्याची अवस्था आहे आणि जे कोण चुकीचे काम करणारे आहेत, त्यांना आम्ही कधीच माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
सिंधुदुर्गमधील अनेक खुनांचा तपास लागला नाही. मी राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून या खुनांची माहिती देणा-या व्यक्तींना बक्षीस जाहीर केले आहे. त्यामुळे लोकांनी जागृत होऊन पोलिसांना माहिती द्यावी. त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे स्पष्ट केले. सरकारने उद्योग विभागाची जमिनीची चौकशी सुरू केली आहे. राणे हेही उद्योगमंत्री होते. त्यांच्या काळातही अनेक जमिनी परस्पर विकल्या गेल्या आहेत. त्यांचीही चौकशी सुरू आहे. त्यामुळे उद्योग विभागातील काही प्रकरणांची चौकशी सुरू असताना राणेंना मंत्रिमंडळात घ्यावे की नाही याचा भाजपने विचार करावा, असा सल्लाही भाजपच्या नेत्यांना दिला आहे.