हरयाणा फॅक्टरचा फायदा होणार? टीम देवेंद्र फडणवीस नव्या आव्हानासाठी सज्ज 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 11:23 AM2024-10-17T11:23:26+5:302024-10-17T11:23:55+5:30

हरयाणात भाजपच्या विजयामुळे आता महाराष्ट्र आपण जिंकू शकतो असा विश्वास आल्याने भाजपला त्याचा फायदा होताना दिसत आहे. टीम देवेंद्र फडणवीस नव्या आव्हानासाठी सज्ज झाली आहे. 

will Haryana factor benefit Team Devendra Fadnavis is ready for a new challenge  | हरयाणा फॅक्टरचा फायदा होणार? टीम देवेंद्र फडणवीस नव्या आव्हानासाठी सज्ज 

हरयाणा फॅक्टरचा फायदा होणार? टीम देवेंद्र फडणवीस नव्या आव्हानासाठी सज्ज 

कसभा निवडणुकीत मोदी करिष्म्यावर विजयाची नौका पार होईल, असा विश्वास भाजपच्या राज्यातील नेत्यांना होता; पण प्रचार सुरू झाला आणि मोदी, कलम ३७०, अयोध्येतील राम मंदिर या मुद्द्यांवरून फोकस स्थानिक मुद्द्यांवर सरकला. त्यातच ‘अब की बार चार सौ पार’च्या घोषणेने संविधान बदलणार आणि शिवाय मोदी सरकार समान नागरी कायदा आणणार असल्याने आदिवासींच्या विशेष हक्कांवर गदा येईल, असा जोरात प्रचार महाविकास आघाडीने केला आणि भाजप बॅकफूटवर गेला. केंद्रात सत्ता तर आली, पण महाराष्ट्राने महायुतीच्या पदरी निराशा टाकली. लोकसभेला हात पोळल्याने विधानसभेला सतर्क झालेल्या भाजपने मविआच्या ‘फेक नरेटिव्ह’विरुद्ध मोहीम उघडली. आता विधानसभेला हे नरेटिव्ह चालणार नाहीत, असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. 

लोकसभेला जातीय समीकरणेही भाजपच्या विरोधात गेली होती. विशेषत: मराठा समाजाने फटका दिला, ओबीसींचीही अपेक्षित मते विदर्भात मिळाली नाहीत. या समीकरणांच्या आघाडीवर भाजपने दोन-तीन महिन्यांत काही उपाय जरूर केले. लहान-लहान समाजांना विश्वासात घेण्यासाठी मोहीम राबविली. ज्यात या समाजांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या, त्यांचे प्रश्न जाणून घेण्यात आले. गेल्या १५-२० दिवसांत काही समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे सरकारने स्थापन केली तो या मोहिमेचाच एक भाग होता. 

हरयाणातील विजयाने दिला विश्वास
लोकसभेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपच्या पाठीशी असल्याचे जाणवत नव्हते. ‘संघाची आता आम्हाला गरज नाही’ या जे. पी. नड्डा यांच्या वाक्याने संघात आणखीच नाराजी पसरली. मात्र, यावेळी संघ भाजपच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिल्याचे दिसत आहे, ही जमेची बाजू. 

बूथपासूनचा कार्यकर्ता पूर्ण ताकदीने प्रचाराला लागलाच पाहिजे यासाठीही एक मोहीम दोन महिन्यांत राबविली गेली. हरयाणात भाजपच्या विजयामुळे आता महाराष्ट्र आपण जिंकू शकतो असा विश्वास आल्याने भाजपला त्याचा फायदा होताना दिसत आहे. टीम देवेंद्र फडणवीस नव्या आव्हानासाठी सज्ज झाली आहे. 

Web Title: will Haryana factor benefit Team Devendra Fadnavis is ready for a new challenge 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.