CoronaVirus: सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या भागांसाठी सरकारचा प्लान तयार? आरोग्यमंत्र्यांचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 04:09 PM2020-04-02T16:09:33+5:302020-04-02T16:14:55+5:30
Coronavirus कोरोनाबाधितांची संख्या जास्त असलेल्या भागांत पूर्ण जमावबंदी लागू करण्याचा विचार
मुंबई: राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्यानं वाढल्यानं राज्य सरकारनं आता महत्त्वाची पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. मागील दिवसांत काही विशिष्ट भागांत कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानं या भागात पूर्ण जमावबंदीचा विचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली. त्यामुळे कोरोना हॉटस्पॉटवर लवकरच पूर्ण जमावबंदी लागू होऊ शकते.
गेल्या काही दिवसांत कोरोबाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोनाच्या चाचण्यांचं प्रमाण वाढत असल्यानं रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे. कोरोनाचं निदान होत असल्यानं लागण झालेल्या रुग्णांवर तातडीनं उपचार करणं शक्य होत असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्यात कोविड रुग्णालयांची उभारणी करण्याचं काम सुरू आहे. एन-९५ मास्क आणि व्हेंटिलेटर्सचं उत्पादन वाढवण्यावर भर दिला जात आहे. सध्याची परिस्थिती पाहता अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन ट्रेनिंग दिलं जाणार आहे, असं टोपेंनी सांगितलं.
सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करण्याचं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं. निझामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमातीच्या मरकजमध्ये सहभागी झालेल्या १३०० जणांचा शोध घेण्यात यश आलं असून त्यांना क्वॉरेंटाईन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. केंद्राच्या सर्व सूचनांचं राज्याकडून पालन करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना सांगितलं. या बैठकीत सर्वच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे थकीत असलेल्या जीएसटीचा मुद्दा उपस्थित केला. राज्याचे १६ हजार कोटी रुपये केंद्रानं अद्याप दिलेले नाहीत. सध्याची आर्थिक परिस्थिती पैशाची चणचण भासू लागली आहे. त्यामुळे केंद्रानं राज्याचा जीएसटीचा वाटा द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केल्याचं टोपेंनी सांगितलं.