शेतकरी आत्महत्या कायमस्वरुपी थांबविण्यासाठी राज्यातील सिंचनक्षेत्राचे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत वाढविणार -  नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 03:24 PM2017-10-23T15:24:04+5:302017-10-23T15:54:48+5:30

शेतकरी आत्महत्या कायमस्वरुपी थांबविण्यासाठी राज्यातील सिंचनक्षेत्र वाढविण्याची आवश्यकता आहे. सध्या केवळ १५ टक्के क्षेत्र सिंचनाखाली येते.हे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचे  रस्ते, वाहतूक आणि महामार्ग तथा जलसंपदा विभागाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

will increase the irrigation potential of the state to 30 percent to stop farmers' suicides: Nitin Gadkari | शेतकरी आत्महत्या कायमस्वरुपी थांबविण्यासाठी राज्यातील सिंचनक्षेत्राचे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत वाढविणार -  नितीन गडकरी

शेतकरी आत्महत्या कायमस्वरुपी थांबविण्यासाठी राज्यातील सिंचनक्षेत्राचे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत वाढविणार -  नितीन गडकरी

googlenewsNext
ठळक मुद्देमाहूर येथे विविध विकासकामांचा शुभारंभराज्यात जलसिंचन क्षेत्र वाढावे यासाठीच नदी जोड प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत २४ हजार कोटी खर्चाचे चार प्रकल्प मंजूर केल्याचे यावेळी गडकरी यांनी सांगितले

- गोकुळ भवरे/नितेश बनसोडे
माहूर (जि. नांदेड):
शेतकरी आत्महत्या कायमस्वरुपी थांबविण्यासाठी राज्यातील सिंचनक्षेत्र वाढविण्याची आवश्यकता आहे. सध्या केवळ १५ टक्के क्षेत्र सिंचनाखाली येते.हे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचे  रस्ते, वाहतूक आणि महामार्ग तथा जलसंपदा विभागाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. येत्या काळात ‘मागेल त्याला वीजपुरवठा’ देण्याचा आमचा निश्चय आहे. या उपक्रमामुळेही सिंचनक्षेत्रवाढीला मदत होईल, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.

गडकरी यांच्या हस्ते सोमवारी माहूर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, वस्त्रोद्योग आणि पशुसंवर्धन मंत्री अर्जुन खोतकर, राज्यमंत्री मदन येरावार, खा. राजीव सातव, लातूरचे खा. सुनील गायकवाड, आदिलाबादचे खा. नागेश घोडाम, आ.प्रदीप नाईक, आ. सुभाष साबणे, आ. नागेश पाटील अष्टीकर, आ. प्रताप पाटील चिखलीकर, आ. राजू तोडसाम, आ. राजेंद्र नजरधने, आ. तानाजी मुटकुळे, नगराध्यक्ष फेरोज दोसानी, माजी खा. डी. बी. पाटील, सुभाष वानखेडे, सूर्यकांता पाटील, अशोक सूर्यवंशी पाटील, राम पाटील रातोळीकर, माजी खा. शिवाजी माने, माजी आ. गजानन घुगे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

नांदेड जिल्ह्यातील रस्त्यांचे चित्र बदलण्यासाठी साडेआठ हजार कोटींचे प्रकल्प दिल्याचे सांगत रेणुकामाता हे माझे कुलदैवत आहे. त्यामुळे माहूरच्या विकासासाठी कुठलीही कमतरता पडू देणार नसल्याचा शब्द गडकरी यांनी दिला. माहुरच्या विकासाला गती देण्यात यश आले असून रेणुकामातेच्या दर्शनासाठी रोपवेचे कामही लवकरच मार्गी लावू, असे ते म्हणाले. मनुष्याच्या शरीरात ज्याप्रमाणात रक्त वाहिन्या काम करीत असतात त्याच पद्धतीचे काम विकासामध्ये रस्त्याचे असते. मी राज्याचा सार्वजनिक बांधकाममंत्री असताना तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा प्रस्ताव सादर केला होता. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात यश आले. केंद्रात बांधकामंत्री झाल्यानंतर राज्यात २२ हजार किमीचे रस्ते तयार करण्यात यश आले. नांदेड जिल्ह्यातील चार महामार्गाबरोबरच सारखणी-मांडवी-आदिलाबाद या ४५ किमी अंतराच्या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करीत असल्याचे सांगत या रस्त्याचे काम लवकरच सुरु करण्यात येईल, अशी घोषणाही नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात केली.

प्रारंभी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी गडकरी यांचा सत्कार केला. भाजपा जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांच्यासह अशोक पाटील सूर्यवंशी यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले. आ. प्रदीप नाईक यांनी मागणी केलेल्या सारखणी-मांडवी-आदिलाबाद या मार्गाला महामार्गाचा दर्जा मिळाल्याने नाईक यांनीही गडकरी यांचे आभार मानले. प्रास्ताविक उत्तम कानिंदे यांनी, सूत्र संचालन   प्रभारी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर तर आभार अंशुमनी श्रीवास्तव यांनी मानले.

किमान गाळ उपसा 
माहूर येथे झालेल्या या कार्यक्रमात गडकरी यांनी नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली. राज्यात जलसिंचन क्षेत्र वाढावे यासाठीच नदी जोड प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत २४ हजार कोटी खर्चाचे चार प्रकल्प मंजूर केल्याचे सांगत या उपक्रमामुळे येणा-या काळात जायकवाडीसह मराठवाड्यातील सर्वच धरणे तुडूंब भरलेली दिसतील. मात्र या धरणांची क्षमता वाढविण्यासाठी धरणातील गाळाचा उपसा करणे आवश्यक आहे.  नवरदेवाला सूट-बुटासह टाय घेऊन देण्याचे काम केंद्राने केले आहे. राज्य सरकारने किमान नवरदेवासाठी अंतरवस्त्रे खरेदी करावीत, अशी कोपरखळी गडकरी यांनी मारली. 

तीन घिरट्यानंतर सापडले हेलिपॅड
सोमवारी विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी नितीन गडकरी माहुरला येणार म्हणून प्रशासनाच्या वतीने हेलिपॅड उभारण्यात आले होते. नियोजितवेळी गडकरी यांचे हेलिकॉप्टर माहूर परिसरात आले. मात्र हेलिपॅड न दिसल्याने गडकरी यांच्या हेलिकॉप्टरने माहूर शहराला तब्बल तीन घिरट्या घातल्या. चौथ्या फेरीवेळी हेलिपॅड नजरेस पडल्यानंतर ते सुरक्षितरित्या हेलिपॅडवर लँड झाले. या प्रकारामुळे काहीकाळ धास्तावलेल्या अधिकारी-कर्मचा-यांचा जीव भांड्यात पडला. 

Web Title: will increase the irrigation potential of the state to 30 percent to stop farmers' suicides: Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.