भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 12:41 PM2022-04-18T12:41:42+5:302022-04-18T12:42:16+5:30
राज्यात कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस सतर्क आहे. गृह विभाग प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या विधानानं राज्यात राजकीय वातावरण पेटलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर(Raj Thackeray) समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केला. मात्र आता राज्य सरकार या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करत असून राज्याचे पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे. त्यानुसार येत्या १-२ दिवसांत भोंग्यांबाबत नियमावली जारी केली जाईल अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) म्हणाले की, राज्याचे पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांची बैठक होणार आहे. या बैठकीत भोंग्यांबाबत निर्णय घेतला जाईल. येत्या १-२ दिवसांत भोंग्यांबाबत मार्गदर्शक सूचना जारी केली जाईल. त्यानुसार पुढील अंमलबजावणी केली जाईल. राज्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केल्यानंतर ही नियमावली जारी केली जाईल असं त्यांनी सांगितले.
तसेच राज्यात कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस सतर्क आहे. गृह विभाग प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. कुणीही तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रात सामाजिक सलोखा राखण्यासाठी सोशल मीडियावर पसरणाऱ्या मेसेजवर लक्ष ठेवले जात आहे. आतापर्यंत धार्मिक भावना दुखावणाऱ्या एकूण ३ हजाराहून अधिक पोस्ट डिलीट केल्या गेल्या आहेत. जर कुठल्याही प्रकारे तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास कारवाई करणार असंही दिलीप वळसे पाटलांनी सांगितले आहे.
नाशिक पोलीस आयुक्तांनी जारी केली नोटीस
नाशिक पोलिसांनी भोंग्यांबाबत नोटीस जारी केले आहे. नाशिक पोलीस आयुक्त दिपक पांडेय म्हणाले की, कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागू नये यासाठी आदेश जारी केले आहे. सर्व धार्मिकस्थळावरील भोंगे, स्पीकरची परवानगी घेणं बंधनकारक आहे. ३ मेनंतर बेकायदेशीर भोंगे हटवण्यात येतील. जर कुणाला हनुमान चालीसा पठण करायचं असेल तर ते मशिदीपासून १०० मीटर अंतरावर आणि दोन्ही एकाचवेळी वाजवू नये. अजानपूर्वी किंवा नंतर १५ मिनिटांनी हनुमान चालीसा लावली तरी हरकत नाही. कुणीही बेकायदेशीर भोंगे लावले तर ४ मेपासून त्यांच्यावर कठोर कारवाई करून भोंगे जप्त करण्यात येतील त्याचसोबत दोषींवर ४ महिने ते १ वर्ष कारावासाची शिक्षा होऊ शकते असंही सांगितले आहे.
मोहित कंबोज यांनी केले स्वागत
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निर्णयाचं स्वागत करत भाजपा नेते मोहिक कंबोज म्हणाले की, ८० टक्के लाऊडस्पीकर हे मदरशांवर लावलेले आहेत २० टक्के लाऊड स्पीकर हे मशिदीवर आहेत. त्यामुळे मदरशांवरील लाऊडस्पीकर हे काढून टाकले पाहिजेत आणि जी मशिद अनधिकृत आहेत त्या मशिदीला लाऊडस्पीकरची परवानगी दिली जाऊ नये. सर्व लोकांनी एकत्रित येऊन ही सामाजिक चळवळ सुरु केलेली आहे. सुप्रीम कोर्टाचे जे काही नियम आहेत ते नियम सरकारने योग्य रीतीने राबवावे आणि मशिदीवरील अनधिकृत भोंगे हे उतरवावे आणि याची सुरुवात मुंबईतून होईल. मुंबईमधून सर्व देशाला दिशा मिळेल असंही त्यांनी सांगितले.