नितेश राणेंविरोधात नोटीस बजावणार, राणे कुटुंबीय माझ्या वाईटावर उठले आहेत - वरुण सरदेसाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 03:47 AM2021-03-16T03:47:26+5:302021-03-16T06:51:03+5:30
राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरदेसाई यांच्यावर आरोप केले. त्यानंतर सरदेसाई यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह पत्रकार परिषद घेऊन राणे यांचे आरोप फेटाळून लावले. मी एका सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित घरातला आहे.
मुंबई : राणे कुटुंबीयांना बेछूट आरोप करायची सवय लागली आहे. नितेश राणे यांनी केलेले सर्व आरोप खोटे आणि तथ्यहीन आहेत. मात्र, अशा आरोपांमुळे माझ्या राजकीय आयुष्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात फौजदारी स्वरूपाची मानहानीची तक्रार दाखल करणार असल्याचे युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी सांगितले. (Will issue notice against Nitesh Rane said Varun Sardesai)
राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरदेसाई यांच्यावर आरोप केले. त्यानंतर सरदेसाई यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह पत्रकार परिषद घेऊन राणे यांचे आरोप फेटाळून लावले. मी एका सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित घरातला आहे. तर, राणे यांच्या कुटुंबाचा इतिहास सर्वश्रुत आहे. राजकीय विरोधकांवर बेछूट आरोप करण्याची त्यांची सवय आहे. नितेश राणे यांनी केलेले सर्व आरोप तथ्यहीन आणि मनाला वेदना देणारे आहेत. त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत अन्यथा फौजदारी स्वरुपाच्या मानहानीच्या खटल्यासाठी तयार रहावे, असा इशारा सरदेसाई यांनी दिला.
सरदेसाई यांना वाय दर्जाची सुरक्षा मिळाल्याचा आरोप नाकारतानाच मला केवळ एक्स दर्जाची सुरक्षा आहे. राणे कुटुंब माझ्या वाईटावर उठल्यानेच महाविकास आघाडी सरकारने मला ही सुरक्षा दिली असावी. मागच्या सहा महिन्यातील त्यांच्या पत्रकार परिषदेतील भाषा पाहिली तर त्याचा अर्थ तोच निघतो, असे सरदेसाई म्हणाले.
आधी शिक्षा, मग चाैकशी करायची हे आमचे धाेरण नाही - अनिल परब
खोटेनाटे आरोप करून राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे. सुशांतसिंह प्रकरणासह अशा सर्व बाबींचा शिवसेनेशी कोणताही संबंध नाही. तपास पूर्ण होऊ द्या, दोषींना माफी नाही. आधी शिक्षा मग चौकशी, हे आमचे धोरण नाही, असे परिवहनमंत्री अनिल परब यावेळी म्हणाले.