भाजप प्रवेशाच्या प्रश्नावर राणे म्हणतात, आधी नवा संसार तर थाटू द्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 03:33 PM2019-09-19T15:33:56+5:302019-09-19T15:34:44+5:30
भाजप प्रवेशाबद्दलच्या पत्रकारांच्या प्रश्नाला राणेंचं उत्तर
सावंतवाडी: आधी मला गृहप्रवेश करुन नवा संसार थाटू दे. त्यानंतर काय ते प्रश्न विचारा, असा टोला खासदार नारायण राणेंनी भाजप प्रवेशाबद्दल प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना लगावला. येत्या आठ दिवसात मी भाजपमध्ये प्रवेश करेन. त्यासाठी आवश्यक असलेलं भविष्य मी काढलंय, असंदेखील राणे म्हणाले. मी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर संपूर्ण जिल्हा भाजपमय होईल. यानंतर जिल्ह्यातले पुढचे आमदार, खासदार भाजपचेच असतील, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुढच्या आठ दिवसात माझा भाजप प्रवेश होईल. त्याबद्दल वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर कोण काय बोलतं याकडे मी लक्ष देणार नाही, असा टोला राणेंनी लगावला. सध्या मी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहे. त्यांच्याशी संवाद साधत आहे. त्यांना माझ्यासोबत येण्याचं आवाहन करत आहे. माझ्या आवाहनाला कार्यकर्त्यांकडूनदेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. कार्यकर्ते भाजप प्रवेशानंतर ठामपणे माझ्या पाठिशी उभी राहतील, असं राणे म्हणाले.
नाणारबद्दल तुमची भूमिका काय, या प्रश्नावर नारायण राणेंनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली. आधी भाजपत प्रवेश करतो. त्यानंतर भूमिका जाहीर करेन, असं राणे म्हणाले. नाणारमध्ये दोन-तीन दिवसात प्रकल्प येणार नाही. त्यामुळे घाई नको. वेळ आल्यावर नाणारबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देईन, असं म्हणत राणेंनी सावध भूमिका घेतली. यावेळी ईव्हीएमबद्दलच्या प्रश्नावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.