आमदार कालिदास कोळंबकर नारायण राणेंची साथ सोडणार ? 21 सप्टेंबरला राहणार अनुपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 01:47 PM2017-09-19T13:47:04+5:302017-09-19T13:56:06+5:30
नारायण राणेंना त्यांच्या संभाव्य बंडात काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर साथ देणार का ? याविषयी सुद्धा साशंकता आहे.
मुंबई, दि. 19 - काँग्रेस विरोधात बंडाचे निशाण फडकविणारे माजी मुख्यमंत्री आणि कोकणातील दिग्गज नेते नारायण राणे येत्या 21 सप्टेंबरला घटनस्थापनेच्या मुहूर्ताला आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबत घोषणा करणार आहेत. नारायण राणे नेमकी कोणती भूमिका घेणार याविषयी राजकीय वर्तुळात विविध अंदाज वर्तवण्यात येत आहेत. यावेळी नारायण राणेंना त्यांच्या संभाव्य बंडात काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर साथ देणार का ? याविषयी सुद्धा साशंकता आहे.
2005 साली नारायण राणेंनी शिवसेना सोडली त्यावेळी कालिदास कोळंबकरही त्यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडले. त्यांनी शिवसेनेच्या आमदाराकीचा राजीनामा दिला व काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवून विधानसभेत प्रवेश केला. नारायण राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आले त्यावेळी शिवसेनेतील काही आमदार, नेते त्यांच्यासोबत होते. पण मधल्याकाळात यातील अनेक नेते, कार्यकर्त्यांनी राणेंची साथ सोडून शिवसेनेमध्ये पूर्नप्रवेश केला.
पण कोळंबकर अजूनही राणेंसोबत आहेत. कट्टर राणेसमर्थक आमदार अशी त्यांची ओळख आहे. पण पुढच्या काही दिवसात हे समीकरण बदलू शकते. कालिदास कोळंबकर वडाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. गेली अनेकवर्ष ते या विभागातून निवडून विधानसभेवर गेले आहेत. 2014 च्या मोदी लाटेतही त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना त्यांचा पराभव करता आला नव्हता. काहींशे मताच्या फरकाने ते विजयी झाले होते.
काल नारायण राणेंनी सिंधुदुर्गात शक्तीप्रदर्शन केले. यावेळी राणे यांचे नेतृत्व मान्य असणारे अनेक नेते व्यासपीठावर होते. पण कालिदास कोळंबकर यांची मंचावरील अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. राणे यांच्या संभाव्य बंडामध्ये कोळंबकर त्यांच्यासोबत जाणार की, विरोधात याविषयी राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु आहेत.
मतदारसंघातील कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे आपण सिंधुदुर्गातील राणेंच्या सभेला उपस्थित राहू शकलो नाही असे कोळंबकरांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. 21 सप्टेंबरला मतदारसंघात घटस्थापनेचा कार्यक्रम असल्याने आपल्याला राणेंसोबत हजर राहणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोळंबकर राणेंसोबत जाणार की, आपला स्वतंत्र निर्णय घेणार ते पुढच्या दोन दिवसात स्पष्ट होईल.