खडसे यांना राष्ट्रवादीत पद मिळणार की सुरक्षा?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 08:32 AM2020-10-22T08:32:51+5:302020-10-22T08:33:33+5:30
महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांकडे मंत्रीपदांचे वाटप झालेले असल्याने सध्या एकही मंत्रीपद रिक्त नाही. त्यामुळे खडसे यांना जर मंत्री करायचे असेल तर राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल.
अतुल कुलकर्णी
मुंबई : माजी मंत्री एकनाथ खडसे हे भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये का येत आहेत, याविषयी उत्सुकता असून खडसे यांना थेट मंत्रिमंडळात घेण्याऐवजी राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्षपद देऊन कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांकडे मंत्रीपदांचे वाटप झालेले असल्याने सध्या एकही मंत्रीपद रिक्त नाही. त्यामुळे खडसे यांना जर मंत्री करायचे असेल तर राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल. विधानपरिषदेवर पाठवायचे तर राज्यपालांनी खडसेंच्या नावाला संमती द्यायला हवी. ती शक्यता कमीच. त्यामुळे तूर्त खडसेंना राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्षपद देऊन कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात येणार असल्याचे समजते. खडसेंना कृषी मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा असली तरी ते पद सध्या शिवसेनेकडे असून आता खातेबदल होणे नाही, असे एका नेत्याने सांगितले.
सध्या खडसे यांना पदापेक्षा सत्तेमुळे मिळणारी सुरक्षा जास्त महत्त्वाची आहे. तर राष्ट्रवादीला भाजपवर तूटून पडणारा फायरब्रँड नेता हवा आहे. भाजपमध्ये एक मोठा गट खडसे यांच्याविषयी सहानुभूती असणारा आहे. त्यांचे अंत:स्थ हेतू खडसे यांंच्या बोलण्याने साध्य होणार असतील तर ते त्यांना हवेच आहेत. या कारणांमुळे खडसे यांंच्या पक्ष प्रवेशाचा मार्ग सोपा झाल्याचे राष्ट्रवादीचे एक ज्येष्ठ नेते म्हणाले.
पद हवे असते तर पक्ष बदलला असता
मला पदच हवे असते तर मी कधीच पक्ष बदलला असता. आपण विरोधी पक्ष नेते असताना पक्ष वाढीसाठी केलेले काम देखील कधीतरी फडणवीस यांनी सांगावे. त्यावेळी ते कोणकोणती कामे घेऊन माझ्याकडे आले हे आजवर कधी बोललो नाही. याच देवेंद्र फडणवीस यांना किती विषयांवर सभागृहात भाषणे करण्याची संधी मी दिली हे देखील त्यांनी सांगावे, असे सांगून खडसे म्हणाले, माझ्यावर झालेल्या अन्यायामुळे, सतत मला बदनाम करण्यामुळे मी पक्ष सोडला आहे. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत तोपर्यंत मला भाजपमध्ये काहीही मिळणार नाही हे माहिती असल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.