कोल्हापूरचे दादा आता पुण्याचे पालकमंत्री होणार का? चंद्रकांत पाटलांनी दिले 'खतरनाक' उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 06:18 PM2022-07-05T18:18:17+5:302022-07-05T18:19:37+5:30
अंतर्गत विरोधामुळे हे सरकार पडेल. मग एक पोकळी निर्माण होईल आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी आम्ही विचार करू. असे आम्ही म्हणत होतो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
महाराष्ट्रात हिंदुत्व विरोधी, विकास विरोधी, विकास कामे ठप्प करणारे, गुन्हेगारांना पाठीशी घालणारे, कुठलीही चूक नसताना जेलमध्ये घालणारे असे एक महाभयानक सरकार बऱ्याच वर्षांपूर्वी कृत्रिम युती करून आले होते. ते देवेंद्र आणि एकनाथ या दोघांच्या अथक प्रयत्नामुळे गेले. महाराष्ट्रात गेल्या १५ दिवसात इलेक्ट्रॉनिक मीडियाचा टीआरपी प्रचंड वाढला होता. कार्यकर्ताच नाही तर सर्वसामान्य माणूस या बातमीची जोडला गेला होता, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.
बंडखोर हा शब्दच चुकीचा आहे. हे सरकार भाजप - शिवसेना युतीचे आहे. मुख्यमंत्री पदावरून कुठलीही नाराजी भाजपमध्ये नाही. हिंदुत्वाचं रक्षण करणारे, विकासाला चालना देणारे हे सरकार असल्याने भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक नेता प्रत्येक कार्यकर्ता खुश आहे, असे म्हणत पाटलांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप माहिती नसल्याचे सांगितले.
लोकशाहीमध्ये बहुमत चालतं, आकडे चालतात. हा आकडा ज्यांच्याकडे आहे तो खरा सरकार मधला पक्ष. पण यावर टिप्पणी करण्यासाठी मी काही घटनातज्ञ नाही. माझ्यासारख्या सर्वसामान्याला जे दिसतं ते म्हणजे आता शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे आणि भाजप शिवसेना हे सरकार आलेलं आहे, असे पाटील म्हणाले.
एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केली होती, तेव्हा भाजपकडून आमचा याच्याशी कोणताही संबंध नाही, असं सांगण्यात आलं होतं. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणालेत, जर कोणी एखादा प्रयत्न करत असेल आणि त्यांना आमची मदत लागली तर आम्ही करायची की नाही मदत? त्यामुळे आमचा तेव्हा आमचा काहीही संबंध नव्हता. आम्ही वारंवार असं मांडत होतो की अंतर्गत विरोधामुळे हे सरकार पडेल. मग एक पोकळी निर्माण होईल आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी आम्ही विचार करू. असे आम्ही म्हणत होतो, असेही स्पष्टीकरण पाटलांनी दिले.
पालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून प्रभाग रचना बदलली जाणार आहे असा आरोप केला जातोय. यावर पाटील म्हणाले, मी काही असं म्हणणार नाही. कारण आधीच्या सरकारने प्रत्येक नियम पायदळी तुडवून जे केलं, असं काही हे सरकार करणार नाही. नियमात काय बसतं हे मला माहीत नाही, असे ते म्हणाले. कोल्हापूरचे दादा आता पुण्याचे पालकमंत्री होतील का? यावर पाटलांनी बगल देत, माहित नाही तुम्हाला कळलं तर मला सांगा, असे उत्तर दिले.