माझा जीव गेल्यावर महाराष्ट्र राहील का?; जरांगे पाटलांचा शिंदे सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 07:21 PM2024-02-13T19:21:35+5:302024-02-13T19:21:56+5:30
शिंदे-फडणवीस मराठ्यांची फसवणूक करू लागलेत - जरांगे पाटील
मराठा आरक्षणावरून मुंबईच्या वेशीपर्यंत आलेल्या मराठा आंदोलकांना माघारी पाठविण्यात शिंदे सरकार यशस्वी ठरले होते. आरक्षणाच्या आंदोलनाचे मोठे यश समजून जरांगे व आंदोलक राज्यभरात आनंद साजरा करत होते. परंतु, आता जरांगे पाटील उपोषणाला बसले असून राज्य सरकारला त्यांनी मोदींची राज्यात एकही सभा होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे.
शिंदे फडणवीस मराठ्यांची फसवणूक करू लागले आहेत, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे. १५ तारखेचे अधिवेशन २० पर्यंत पुढे का ढकलले असा सवाल करून जरांगे यांनी राजकारण्यांना नीच असा शब्द वापरला आहे. याचबरोबर उद्याच्या उद्या सगेसोयरे असा शब्द असलेला आरक्षणाचा कायदा करावा, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.
जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. यावरून जरांगे यांनी माझा जीव गेल्यावर सरकार राहिल का? महाराष्ट्र राहिल का असे म्हणत महाराष्ट्राची श्रीलंका होईल असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईकडे निघाले होते. त्यांना नवी मुंबईत रोखत सरकारने आंदोलकांची बोळवण केली होती. यावरून अनेकांनी मराठ्यांना काहीच मिळाले नाही, अशी टीका करण्यात आली होती. यानंतर आता जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत.