भिवंडीला विकासाचे मॉडेल बनवणार
By admin | Published: May 21, 2017 02:07 AM2017-05-21T02:07:51+5:302017-05-21T02:07:51+5:30
भिवंडी हा छोटा भारत असून तो आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज बनला पाहिजे. आज भिवंडीला अस्वच्छ शहर म्हणत जे नाकं मुरडतात त्यांना भविष्यात भिवंडी हेच वास्तव
- लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : भिवंडी हा छोटा भारत असून तो आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज बनला पाहिजे. आज भिवंडीला अस्वच्छ शहर म्हणत जे नाकं मुरडतात त्यांना भविष्यात भिवंडी हेच वास्तव करण्यायोग्य शहर वाटले पाहिजे, असे विकासाचे मिनी मॉडेल आम्ही येथे साकारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी कामतघर येथील जाहीर सभेत केली.
भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. ते म्हणाले की,निवडणूकीपूर्वीच आम्ही भिवंडीला ३४ योजनांकरिता हजारो कोटी रुपये दिले. शहरात सुविधा निर्माण करण्यासाठी लागेल तेवढा निधी आम्ही देऊ. कोणत्याही जाती-धर्माची व्यक्ती गरीब, बेघर असेल कच्च्या घरात राहत असेल तर त्यास पंतप्रधानमंत्री योजनेंतर्गत घर देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
भिवंडीचा चेहरा बदण्यासाठी राज्य सरकार निधी देईल पण जर महापालिकेत चोरांचे सरकार आले. तर तो निधी चोरांच्या खिशात जाईल. निधी चोरांच्या खिशात जाऊ नये असे वाटत असेल तर भाजपाचे सरकार महापालिकेत आणा. त्यानंतर माझ्या लोकांनी जर भ्रष्टाचार केला तर मोदींची शपथ घेऊन सांगतो की, त्या व्यक्तीला मी भाजपामधून काढून टाकीन. त्याचे उरलेले दिवस जेलमध्ये जातील. महापालिका ही पैसे कमविण्याची मशीन नाही. मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर ज्याप्रमाणे प्रधानसेवक म्हणून काम करीत आहेत त्याप्रमाणे आमचा महापौर महासेवक म्हणून भिवंडीच्या विकासाकरिता काम करेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. देश व महाराष्ट्र बदलत आहे. त्याचप्रमाणे भिवंडी देखील बदलायला पाहिजे. शहर बदलण्याचे काम आपले अनमोल मतदान करणार आहे. जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी आपण भाजपा- आरपीआय महायुतीला विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
‘फडणवीस राज्याच्या विकासाचा सूर्य’
भिवंडीचा विकास मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून भाजपाने केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस राज्याच्या विकासाचे सूर्य आहेत, अशी उपमा खासदार कपिल पाटील यांनी दिली. हा सूर्य ज्याठिकाणी जातो तेथे विकास होतो. विकासाचा विश्वास दिल्याने भिवंडीतील मुस्लिम भाजपाकडे आकर्षित झाले आहेत. भिवंडीत या निवडणुकीत २२ मुस्लिम उमेदवार भाजपाने दिल्याचा पाटील यांनी उल्लेख केला. यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचेही भाषण झाले.
शिवसेनेचे गाजर वाटप
परिवर्तन सभेपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस हे शिवाजी चौकामधील ‘प्रेसिडन्सी प्लाझा’मध्ये गेले होते. तेथे त्यांनी कोणार्क विकास आघाडी व भाजपाला मतदान करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. हे निमित्त साधून, शहर शिवसेना शाखेच्या वतीने शिवसैनिकांनी यावेळी लोकांना गाजराचे वाटप केले. यापूर्वी केडीएमसी निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पॅकेजचे पैसे न आल्याने भिवंडीत त्यांनी तसेच आश्वासन देण्यापूर्वी त्यांचा निषेध करीत असल्याचे सेनेने सांगितले.
जाहीरनाम्याने प्रकाशन
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भाजपाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी माजीमंत्री जगनाथ पाटील, आमदार किसन कथोरे, महेश चौगुले, नरेंद्र पवार, गणपत गायकवाड, जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी आदी उपस्थित होते.
आठवलेंची मैफल
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कवितांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. ‘या ठिकाणी सुटली आहे हवा, तेथे घडणार परिवर्तन नवा’ ‘गल्ली-गल्लीत दिली जात आहे दवंडी, भाजपा आणि आरपीआयच जिंकणार आहे भिवंडी आणि फडणवीस आणि आम्ही आहोत विकासाच्या बिल्डिंग बांधणारे गवंडी’, ‘देश की गरीबी नही हटी इसलिए आ गई है जीएसटी’, ‘पंतप्रधान मोदी है एक तारा जिसने बजाए काँंग्रेस के बारा’