भाजपाच्या मंत्र्यांनाही गोरक्षक धोपटून काढणार का ? - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 07:55 AM2017-07-19T07:55:07+5:302017-07-19T08:47:48+5:30

स्वयंघोषित गोरक्षकांकडून होणा-या हिंसाचाराच्या घटनांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून ताशेरे ओढले आहेत.

Will the ministers of the BJP cure the ministers? - Uddhav Thackeray | भाजपाच्या मंत्र्यांनाही गोरक्षक धोपटून काढणार का ? - उद्धव ठाकरे

भाजपाच्या मंत्र्यांनाही गोरक्षक धोपटून काढणार का ? - उद्धव ठाकरे

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - स्वयंघोषित गोरक्षकांकडून होणा-या हिंसाचाराच्या घटनांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून ताशेरे ओढले आहेत. गोमांस बाळगल्याच्या संशयावरुन मुसलमानांवरील हल्ल्यांचं सत्र वाढत आहे व या अमानुष कृत्याचं समर्थन कुणालाच करता येणार नाही, असेही उद्धव यांनी नमूद केले आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांना दम भरुनही त्यांच्याकडून होणारा हिंसाचार थांबत नसल्याचं सांगत त्यांनी दुसरीकडे गोव्यात भाजपाचे राज्य आहे, पण तिथे गोमांसावर बंदी नाही. केरळ व ईशान्येकडील राज्यांत गोमांस हे रोजचे अन्न आहे व तेथील भाजपाच्या मंत्र्यांनीच गोमांस चवीने खात असल्याची कबुली दिली आहे, ही बाब मांडत भाजपाच्या या मंत्र्यांनाही गोरक्षक धोपटून काढणार आहेत काय?, असा प्रश्न उद्धव यांनी उपस्थित केला आहे.   
 
शिवाय, मोदी यांच्या मार्गात काटे पेरण्याचे काम हे तथाकथित गोरक्षक करीत आहेत, असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसंच गोमांस किंवा गोरक्षणाचे काम धर्माचे असेल तर कश्मीरात जाऊन देशरक्षणाचे कामही देव आणि धर्माचे आहे, असे गोरक्षकांना ठणकावलं आहे. 
 
काय आहे सामना संपादकीय ?
गोरक्षक म्हणवून घेणाऱ्यांनी देशभरात जो हैदोस घातला आहे त्यामुळे पंतप्रधान मोदींनाही टीका सहन करावी लागत आहे. कथित गोरक्षक ही दुकानदारी असून त्यांची गय केली जाणार नाही असा दम भरूनही गोरक्षकांचे थैमान थांबलेले नाही. महाराष्ट्रापासून देशाच्या अनेक भागांत गोमांस बाळगल्याच्या संशयावरून मुसलमानांवरील हल्ले व हत्यासत्र सुरूच आहे आणि या अमानुष कृत्याचे समर्थन कुणालाच करता येणार नाही. समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी आता यावर तोंड उघडले आहे. गोरक्षकांचे हल्ले थांबले नाहीत तर मुस्लिम समाजास प्रत्युत्तर द्यावे लागेल व हाती शस्त्र घेऊन संरक्षण करावे लागेल अशी चिथावणीची भाषा त्यांनी वापरली आहे. अबू आझमीसारख्यांना अशी चिथावणीखोर भाषा वापरण्याची संधी देणारे आपणच आहोत, पण गोरक्षणाचे भूत मानगुटीवर बसलेल्यांना हे समजवणार कोण? गोमांसावरून हिंदू व मुसलमानांतील झगड्याने टोक गाठले तर ते पाकिस्तानला हवेच आहे आणि या झगडय़ाचा फायदा घेऊन ते दंगली व घातपात घडवू शकतात. सीमेवर आधीच तणाव आहे. त्यात देशांतर्गत असा वणवा पेटला तर ते परवडणारे नाही. पंतप्रधान मोदी यांच्या गुजरात राज्यातही गोरक्षकांनी अनेकांना संशयावरून बेदम मारले आहे, पण गुजरात राज्यातील अमरनाथ यात्रेकरूंवर अतिरेक्यांनी गोळीबार करून
 
ठार मारले तेव्हा
हे सर्व गोरक्षक काय करीत होते? त्यांनी हाती शस्त्र वगैरे घेऊन कश्मीरात जायला हरकत नव्हती. मर्दानगी व हिंमत ही सर्वच स्तरांवर दाखवायला हवी. गोमांस किंवा गोरक्षणाचे काम धर्माचे असेल तर कश्मीरात जाऊन देशरक्षणाचे कामही देव आणि धर्माचे आहे. पंतप्रधान मोदी हे गोरक्षकांवर संतापले आहेत व त्यांनी बजावले आहे, ‘‘गोमातेवर इतकेच प्रेम असेल तर गाईला प्लॅस्टिक खाण्यापासून वाचवा. तेसुद्धा एक प्रकारे गोरक्षणच आहे.’’ पंतप्रधान म्हणाले ते खरेच असले तरी गोरक्षणाची दुकानदारी चालविणाऱ्यांना हे सांगायचे कोणी? गोवंश हत्याबंदीचा कायदा काही राज्यांत झाला आहे, पण अनेक राज्यांत गोमांस हे त्यांचे रोजचे खाणे आहे. गोव्यात भाजपचे राज्य आहे, पण तिथे गोमांसावर बंदी नाही. केरळ व ईशान्येकडील राज्यांत गोमांस हे रोजचे अन्न आहे व तेथील भाजपच्या मंत्र्यांनीच गोमांस चवीने खात असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या मंत्र्यांनाही गोरक्षक धोपटून काढणार आहेत काय? भ्रष्टाचाराचा जो कायदा आहे त्यानुसार पैसे घेणाऱ्याइतकाच पैसे देणाराही दोषी ठरतो. मग आता गोमांस विकणाऱ्यांबरोबर गोमांस खाणाऱ्यांनाही फासावर लटकवले जाणार आहे काय? मोदी यांच्या मार्गात काटे पेरण्याचे काम हे तथाकथित गोरक्षक करीत आहेत व गोरक्षकांपुढे मोदी यांनी हात टेकले आहेत असेच आता वाटते. कारण इतक्या वेळा
 
दम भरूनही
गोरक्षकांचे उपद्व्याप थांबलेले नाहीत. एका माणसाला एकटे गाठून ४०-५० जणांचा जमाव बेदम मारहाण करतो व कायदा बघ्याची भूमिका घेतो हे धक्कादायक आहे. दिल्लीपासून नागपूरपर्यंत हे घडते. यामागे एखादे षड्यंत्र आहे काय? देशात सध्या माणसाच्या आयुष्यापेक्षा गाय आणि बैलाच्या आयुष्याला जास्त महत्त्व प्राप्त झाले असले तरी गेल्या तीन वर्षांत गोमांसाची निर्यात वाढली आहे व त्यातून हिंदुस्थानला मोठे परकीय चलन मिळाले आहे. मग हा पैसा देशाच्या विकासकामासाठी वापरण्याचा अपराध पंतप्रधान मोदी यांनी करू नये असेच गोरक्षकांना सांगायचे आहे काय? देशात सध्या हिंदू विचारांचे राज्य असले तरी हे तालिबान्यांचे किंवा इराणच्या खोमेनींचे राज्य नाही. अमरनाथ यात्रेकरूंचे प्राण वाचविणारा एक सलीमच होता. कश्मीरातील अतिरेक्यांच्या हल्ल्यात गेल्या चारेक महिन्यांत अनेक मुसलमान पोलीस शहीद झाले आहेत. गोरक्षक म्हणवून घेणाऱ्यांनी याचे भान ठेवले तर बरे होईल. कारण मुसलमानांचे पुढारी हाती शस्त्र घेण्याची चिथावणीखोर भाषा करीत आहेत. त्याचे परिणाम देशाला भोगावे लागतील. पुन्हा अशा दुर्दैवी संघर्षात स्वतःला गोरक्षक म्हणवून घेणारे ठेकेदार कुठेच दिसत नाहीत. मग छातीवर वार झेलावे लागतात ते शिवसैनिकांना. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आम्हाला ते पार पाडावे लागते.

Web Title: Will the ministers of the BJP cure the ministers? - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.