कोकण पदवीधर निवडणुकीत मनसे बाजी मारणार?; "राज ठाकरेंचा डाव खरा ठरणार..."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 02:34 PM2024-05-31T14:34:21+5:302024-05-31T14:35:19+5:30
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
खेड - MNS Vaibhav Khedekar on BJP ( Marathi News ) विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत मनसेनं अभिजीत पानसे यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. तर याठिकाणी या मतदारसंघाचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनीही तयारी सुरू केली आहे. भाजपाकडून अद्याप या मतदारसंघात उमेदवार घोषित केलेला नाही. परंतु भाजपानं दोस्ती निभवावी. जर दोस्ती दिर्घकाळ टिकवायची असेल तर हातात हात घालून पुढे गेले पाहिजे असं विधान मनसेचे कोकणातील नेते वैभव खेडेकर यांनी म्हटलं आहे.
वैभव खेडेकर म्हणाले की, राज ठाकरे निर्मळ मनाचे आणि स्वच्छ मार्गाने जाणारे आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी बिनशर्त पाठिंबा दिला. कुठलीही अपेक्षा ठेवली नाही. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मनसेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपानेही निरंजन डावखरेंच्या माध्यमातून तयारी सुरू केलीय. परंतु अधिकृत घोषणा अजून त्यांनी केली नाही. राज ठाकरेंचा आदेश मानून आम्ही अभिजीत पानसे यांचं काम सुरु केलं आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच या पदवीधर मतदारसंघात बदल हवाय. माझ्यासारखे पदवीधर मतदार आहेत. त्यांच्या समस्या विधान परिषदेत मांडण्यासाठी अभिजीत पानसे यांच्यासारखा शिक्षणात गाढा अभ्यास असलेला सक्षम उमेदवार पक्षाने दिला आहे. या जिल्ह्यात बदलाचे वारे वाहतायेत. अभिजीत पानसे चांगल्या मताधिक्यांनी निवडून येतील. मनसे हा स्वतंत्र पक्ष आणि चिन्ह आहे. या शहरात नगरपालिका मनसेकडे आहे. एक आमदार आहे. या मतदारसंघावर परिणाम करणारा मनसेचा उमेदवार आहे. राज ठाकरेंनी टाकलेला हा डाव खरा ठरणार आहे असा विश्वास मनसे नेते वैभव खेडेकर यांनी व्यक्त केला.
दरम्यान, १२ तारखेपर्यंत या मतदारसंघात अनेक घडामोडी घडतील. बरेच पाणी पूलाखाली वाहून जाईल. भाजपाने जसं आम्हाला शुभेच्छा दिल्या तसं आम्हीही त्यांना शुभेच्छा देतो. गेल्या निवडणुकीत आम्ही त्यांना मदत केली होती. आता त्यांची जबाबदारी आहे त्यांनी आम्हाला मदत करावी. दोस्ती निभवावी, जर दोस्ती दिर्घकाळ टिकवायची असेल तर हातात हात घालून पुढे गेले पाहिजे. राज ठाकरेंचा आदेश मानून आम्ही मतदारसंघात कामाला लागलो आहे असंही वैभव खेडेकर यांनी सांगितले आहे.