भाजपमध्ये गेलेले मोहिते पाटील 'माळशिरस'ही घेऊन जाणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 06:01 PM2019-07-23T18:01:26+5:302019-07-23T18:03:42+5:30

लोकसभेत मोहिते-पाटील यांनी भाजपच्या उमेदवाराला मिळवून दिलेली लीड विजयाचे कारण ठरली.

Will Mohite Patil take over Malshiras from ncp | भाजपमध्ये गेलेले मोहिते पाटील 'माळशिरस'ही घेऊन जाणार का ?

भाजपमध्ये गेलेले मोहिते पाटील 'माळशिरस'ही घेऊन जाणार का ?

googlenewsNext

मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघात माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे माळशिरस मतदारसंघातील समीकरणे बदलण्याचे चिन्हे दिसत आहे. मोहितेंच्या साथीने सलग चौथ्यांदा माळशिरमध्ये आमदार निवडून आणणाऱ्या राष्ट्रवादीला यावेळी त्याच मोहितेंच्या विरोधाला सामोर जावे लागणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये गेलेले मोहिते पाटील 'माळशिरस'ची जागा सुद्धा राष्ट्रवादीच्या ताब्यातून घेऊन जाणार का ? अशी चर्चा पहायला मिळत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील आणि माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या माळशिरस विधानसभा मतदारसंघ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना तालुक्यात १ लाख २० हजार मतदान झाल्याने खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे ८१ हजार एवढ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यामुळे माळशिरस तालुक्यात भाजपची ताकद वाढली तर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद घटली असल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी विजयसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या भाजपमध्ये जाताच पंचायत समितीच्या राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांनी भाजप प्रवेश केल्याने माळशिरस पंचायत समितीही भाजपच्या ताब्यात गेली आहे. त्यात लोकसभेत मोहिते-पाटील यांनी भाजपच्या उमेदवाराला मिळवून दिलेली लीड विजयाचे कारण ठरली. त्यामुळे आता विधानसभेत सुद्धा मोहिते-पाटील हे आघाडीच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल.

लोकसभा निवडणूक २०१९

रणजितसिंह नाईक-निंबाळकर ( भाजप ) - १ लाख २० हजार

संजयमामा शिंदे ( काँग्रेस ) - ४२ हजार ३९५

विधानसभा निवडणूक २०१४

हनुमंतराव डोळस ( राष्ट्रवादी ) - ७७ हजार १७९

आनंत खंडागळे ( अपक्ष ) - ७० हजार ९३४

 

 

Web Title: Will Mohite Patil take over Malshiras from ncp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.