माकडांच्या नसबंदीने आंबा बागांचे नुकसान थांबेल का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2023 08:54 AM2023-12-25T08:54:34+5:302023-12-25T08:56:13+5:30
प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहे.
योगेश बिडवई, मुख्य उपसंपादक
कोकणात आंबा, नारळी-पोफळीच्या, केळीच्या बागा, भात, कडधान्ये आदींचे माकडांच्या उच्छादामुळे नुकसान होते. माकडांच्या टोळ्याच्या टोळ्या शेतात येतात आणि धुडगूस घालतात. केळी खातात. नारळ पाडतात. शेतीचे काही वेळा भयंकर नुकसान होते. जंगलात खाद्य मिळत नसल्याने माकडे नागरी वस्तीत येतात. कधी कधी तर ते थेट अलिबागपर्यंत येतात. माकडांचा बंदोबस्त करण्याचे अनेक उपाय सुरू असताना आता थेट माकडांची नसबंदी करून त्यांची संख्या नियंत्रित ठेवण्याचे वन विभागाने ठरविले आहे. त्यातून शेतीचे नुकसान कमी करण्याचा प्रयत्न आहे. तसा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहे.
हिमाचल प्रदेशात माकडांच्या नसबंदीला परवानगी मिळाली आहे, आता त्याच धर्तीवर कोकणातही माकडांची नसबंदी करण्याची योजना असल्याचे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी झालेल्या बैठकीत नुकसान भरपाई कशी देता येईल, यावरही चर्चा झाली. केंद्र सरकारने या योजनेला हिरवा कंदील दिला तर कोकणातील बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोकणात गेल्या वर्षांत माकडांचा उच्छाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे. खोपोली, कर्जत, उरण, पनवेलचा भाग सोडला तर अलिबाग, पेण, महाड, श्रीवर्धनस म्हसळा या भागांत माकडांचा शेतकऱ्यांना मोठा त्रास होतो. माकडांचा उपद्रव कमी करण्यासाठी कृषी विभागाने काही उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. त्यास चांगले यशही मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांना योजनेत सहभागी करून मुख्याध्यापकांच्या मदतीने सीडबॉल तयार केले जातात. पावसाळ्यात जंगलात फळझाडे लावली जातात.
जंगलात माकडांना खाद्य मिळाले तर ते नागरी वस्तीत येणार नाहीत, हा त्यामागचा उद्देश आहे. त्याप्रमाणे बागांमध्ये वनस्पतींच्या अर्कापासून बनविलेले बायोलॉजिकल पेस्टिसाईड फवारले जाते. त्याच्या उग्र वासाने माकडे त्या भागात येत नाही. अधूनमधून चार-पाच वेळा त्याची फवारणी केल्यानंतर माकडांना तो वास सहन होत नाही. त्यामुळे ते त्या भागात येत नाही, असा कृषी विभागाचा अनुभव आहे. हा प्रयोग आता मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना त्याची प्रात्यक्षिके करून दाखविली जात आहेत.
यंदाच्या हंगामात या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे माकडांचा उपद्रव कमी होण्यास मदत होईल. माकडांच्या त्रासामुळे अनेक बागायतदारांनी केळी, आंबे, कडधान्यांचे पीक घेणे बंद केले आहे. काही भागात फक्त सुपारी आणि नारळाचे उत्पादन घेतले जाते. बागायतदारांच्या मते नसबंदी करणे हा उच्छाद थांबविण्याचा मार्ग नाही. जंगलतोड थांबविली पाहिजे. वनविभागावर त्याची जबाबदारी आहे. त्यांनी आदिवासींनी विश्वासात घेऊन जंगलांचे संवर्धन केले पाहिजे. त्यांनी योग्य पद्धतीने जबाबदारी पार पाडली तर माकडे जंगलातच राहतील.