मुंबई सेंट्रल आगार बंद होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2016 01:57 AM2016-09-03T01:57:06+5:302016-09-03T01:57:06+5:30
दक्षिण मुंबईकरांसह अनेकांना सोयीस्कर पडणारा आणि एसटी मुख्यालयाला लागूनच असलेले सर्वांत जुने मुंबई सेन्ट्रल येथील एसटीचे आगार बंद करण्याच्या हालचाली सुरु झाल्या
मुंबई : दक्षिण मुंबईकरांसह अनेकांना सोयीस्कर पडणारा आणि एसटी मुख्यालयाला लागूनच असलेले सर्वांत जुने मुंबई सेन्ट्रल येथील एसटीचे आगार बंद करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. आगारातून चालवण्यात येणाऱ्या बसेसना मिळणारा अल्प प्रतिसाद, खर्च आणि दादरपुढे येणाऱ्या एसटी बसेसमुळे होणारी वाहतूक कोंडी हे प्रमुख कारण पुढे केले जात आहेत.
१९९१च्या महसूल संरचनेनुसार प्रत्येक तालुक्यात एसटीचे आगार उभारण्यात आले. वाहतूकीचे अन्य पर्याय उपलब्ध झाल्याने, त्यातच प्रवासी कमी होत गेल्याने आणि वाढलेला खर्च यामुळे आगारांचे भारमान हे कमी होत गेले.
त्यामुळे खर्च कमी भारमान कमी असलेल्या आगारांतील बस सेवा बंद करुन त्या अन्य आगारांत वळवण्याचे धोरण महामंडळाने अवलंबविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई सेन्ट्रल आगारातील लांब पल्ल्याची वाहतूक अन्य आगारात वळवण्यात येत आहेत.
या आगारातून दिवसाला जवळपास एक हजार बसेसचे वेळापत्रक हाताळत असताना आता हा आकडा ७५० बसेसपर्यंत आला आहे. सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत दादरपुढे अवजड वाहनांना बंदी आहे.
बसेस दादरच्या पुढे येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून दादरपुढे एसटी बस न आणण्याची सातत्याने मागणी केली जात असल्याचेही कारण पुढे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
परळ, कुर्ला येथील पर्याय
मुंबई सेंट्रलमधून सुटणाऱ्या कोकण
व पश्चिम महाराष्ट्राच्या बस फेऱ्या
या परळ आगारातून, खान्देश व मराठवाड्याच्या बसेस या कुर्ला
नेहरु नगर आगारातून सोडण्याचे नियोजन सुरू आहे.
मुख्यालयाचे नूतनीकरण
मुंबई सेन्ट्रलमधील एसटी मुख्यालयाचे नूतनीकरण केले जाणार आहे. त्यासाठी कोट्यवधींचा खर्च येणार आहे. मात्र त्याआधी स्ट्रक्चरल आॅडिट केले जाईल. त्यात इमारत चांगली असेल तरच नूतनीकरण केले जाईल.
आगारांतील फेऱ्यांचे सुसूत्रीकरण करण्यावर आम्ही भर देत आहोत. एकाच आगारातून एकाच मार्गावर दहा फेऱ्या सुटत असतील आणि त्याला प्रतिसाद नसेल तर अन्य फेऱ्या बंद केल्या जात आहेत. आणखी पडताळणी करत आहोत. - रणजित सिंह देओल, व्यवस्थापकीय संचालक, एसटी