2029 मध्येही पुन्हा पंतप्रधान होणार नरेंद्र मोदी...? 5 वर्ष आधीच केली भविष्यवाणी, काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 09:51 AM2024-08-31T09:51:58+5:302024-08-31T09:53:09+5:30
2029 मध्ये देशात पुन्हा एकदा एनडीए सरकार येणार अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केली आहे...
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर (2024) देशात एनडीएचे सरकार स्थापन झाले असले तरी, यावेळी भाजपला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. या निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीसंदर्भात अजूनही चर्चा होताना दिसते. यातच आता, पाच वर्षांनंतर, म्हणजेच 2029 मध्ये देशात पुन्हा एकदा एनडीए सरकार येणार अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केली आहे. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले होते.
2029 मध्येही मोदी सरकार! -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'इशाऱ्या-इशाऱ्यात' म्हटले आहे की, आपण 2029 मध्ये सलग चौथ्यांदा सत्तेत येणार आहोत. पाच वर्षांनंतर देशात पुन्हा एकदा एनडीएचेच सरकार स्थापन होईल. ते मुंबई येथे ग्लोबल फिनटेक फेस्टला संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले, हा पाचवा फिनटेक फेस्ट आहे आणि पाच वर्षांनंतर होणाऱ्या दहाव्या फिनटेक फेस्टसाठीही आपण येणार.
अर्थात पंतप्रधान मोदी यांनी संकेत दिले आहे की, पाच वर्षांनंतरही केंद्रात त्यांचेच सरकार असेल आणि ते पंतप्रधान म्हणून फिनटेक फेस्टमध्ये सहभागी होतील. एढेच नाही, तर आमचे बेस्ट समोर येणे अद्याप बाकी आहे, असेही मोद यांनी म्हटले आहे. भाजप नेते संबित पात्रा यांनी आपल्या एक्स अकाउंटवर PM मोदींचा यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.
ये Fintech का 5वाँ समारोह है, मैं 10वें में भी आऊंगा।
— Sambit Patra (@sambitswaraj) August 30, 2024
- PM श्री @narendramodi जी pic.twitter.com/qT5NKeSNAQ
आणखी काय म्हणाले मोदी? -
मोदी म्हणाले, आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल होत आहे. एक काळ होता, जेव्हा लोक भारतात येत आणि आपली सांस्कृतिक विविधता पाहून आश्चर्य चकित होतं. आता जेव्हा ते येतात, तेव्हा त्यांना आमची फिनटेक विविधता पाहून आश्चर्य वाटते. विमानतळावर उतरण्यापासून ते खरेदीपर्यंत सर्वत्र भारताची फिनटेक क्रांती दिसून येते. गेल्या 10 वर्षांत, फिनटेक क्षेत्रात 31 अब्ज डॉलर एवढी मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे.
फिनटेक क्रांती कशी होणार? चहावाल्याला विचारले जात होते -
मोदींनी भारतातील स्वस्त मोबाईल फोन, डेटा आणि झिरो बॅलन्स जनधन बँक खात्यांचा उल्लेख करत विरोधकांवर निशाणा साधला. मोदी म्हणाले, "आपल्याला आठवत असेल, पूर्वी काही लोक संसदेत उभे राहून विचारत होते, स्वतःला अत्यंत विद्वान समजणारे लोक विचारत होते, सरस्वती जेव्हा बुद्धी वाटत होती, तेव्हा ते रस्त्यावर पहिले उभे होते. ते म्हणायचे, भारतात बँकेच्या एवढ्या शाखा, इंटरनेट आणि बँका नाहीत. एवढेच नाही तर, भारतात वीजही नाही, असेही ते म्हणत होते. ते म्हणायचे, फिनटेक क्रांती कशी होईल? आणि हे माझ्यासारख्या चहावाल्याला विचारायचे. पण आज अवघ्या एका दशकात भारतात ब्रॉडबँड वापरकर्ते 6 कोटींवरून 94 कोटी झाले आहेत. आज, 18 वर्षांच्या वरचा क्वचितच कुणी भारतीय असेल, ज्याची डिजिटल ओळख म्हणजेच आधार कार्ड नसेल. एवढेच नाही तर, गेल्या 10 वर्षात 53 कोटींहून अधिक लोक बँकिंग प्रणालीशी जोडले गेले आहेत," असेही ते म्हणाले.