...याच्यानंतर कधीच पराभव पाहणार नाही- राज ठाकरे
By admin | Published: March 9, 2017 08:15 PM2017-03-09T20:15:59+5:302017-03-09T20:15:59+5:30
निवडणुकांत पाहिलेला पराभव, हा शेवटचा पराभव आहे, याच्यानंतर कधीच पराभव पाहणार नाही
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - निवडणुकांत पाहिलेला पराभव, हा शेवटचा पराभव आहे, याच्यानंतर कधीच पराभव पाहणार नाही, असा निर्धार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे. मनसेच्या 11व्या वर्धापनदिनानिमित्त षण्मुखानंद येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी राज ठाकरे बोलत होते.
ते म्हणाले, पैसा जिंकला आणि काम हरलं. कामाचा आणि निवडणुकीचा काही संबंध नसतो हे दिसलं, कामं उगाच केली असं वाटतंय, नाशिकमध्ये आम्ही कामं करून सुद्धा ज्यांनी गुंडांना तिकिटं दिली, ते निवडून आले, आता जे जिंकले आहेत त्यांचे फासे मी घेणार आहे. जिंकणाऱ्यांनी ज्या ज्या गोष्टी केल्या, त्या गोष्टी यापुढे मीही करणार, तुम्ही मला कसं लढायचं हे शिकवलं, प्रशांत परिचारकसारख्या माणसांना चौकाचौकात चपलांनी चोपलं पाहिजे, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.
आजपर्यंत तुम्ही मला भेटायला येत होता, आता मी तुम्हाला भेटायला येईन. आता माझ्या सकट आपले सर्व नेते तुमच्या भेटीला येणार आहेत. मनसेला मतदान केलेल्यांचे राज ठाकरेंनी आभारही मानले आहेत. मनसेचे उमेदवार आणि मतदारांचे धन्यवाद, ज्यांनी मनसेला मतदान केलं नाही त्यांनी मला निवडणूक कशी लढवायची हे शिकवलं, असंही वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे. मनपा निकालाबाबत कधी बोलणार असे पत्रकार विचारत होते, पण काय बोलायचं ?, अशी खंतही राज ठाकरेंनी व्यक्त केली.