सर्वसामान्य जनतेसारखे नितेश राणे एकटे कधी फिरणार ? - वैभव नाईक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 06:22 PM2017-09-12T18:22:04+5:302017-09-12T18:22:04+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा मोठा वाटा आहे. अशा प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञावर एकतर्फी टीका करून आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्गची मान खाली घातली आहे. असे सांगतानाच वयोवृद्ध बाबासाहेब पुरंदरे यांना एकटे कधी फिरणार, असा सवाल विचारणारे आमदार राणे स्वतः सर्वसामान्य जनतेसारखे एकटे कधी फिरणार आहेत? असा उपरोधिक सवाल शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार वैभव नाईक यांनी विचारला आहे.
कणकवली, दि. 12 - छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा मोठा वाटा आहे. अशा प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञावर एकतर्फी टीका करून आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्गची मान खाली घातली आहे. असे सांगतानाच वयोवृद्ध बाबासाहेब पुरंदरे यांना एकटे कधी फिरणार, असा सवाल विचारणारे आमदार राणे स्वतः सर्वसामान्य जनतेसारखे एकटे कधी फिरणार आहेत? असा उपरोधिक सवाल शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार वैभव नाईक यांनी विचारला आहे.
येथील विजय भवनात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जयेंद्र रावराणे, नगरसेवक सुशांत नाईक उपस्थित होते.
यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका करणाऱ्या आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्गात कोणाची भीती आहे? काळ्या सफारीवाले आणि शिट्टीवाल्यांच्या गराड्यात ते का फिरत आहेत ? याचे त्यांनी उत्तर द्यावे. बाबासाहेब पुरंदरे यांनी त्याच्या तारुण्याच्या काळात सर्व गड, किल्ले एकट्याने पादाक्रांत केले आहेत.
तसेच त्यांचा इतिहास जनतेसमोर मांडला आहे. त्यामुळे अशा थोर व्यक्तीवर टीका करणे चूक आहे. सिंधुदुर्गातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत सांगत आहेत. काँग्रेस पक्षाच्या चिन्हाचा फायदा घ्यायचा, मते मिळवायची आणि काँग्रेसच्या बैठकीलाच विरोध करायचा, अशी दुटप्पी भूमिका का घेतली जात आहे.
थोड्याच दिवसात सिंधुदुर्गातील काँग्रेस भाजपामध्ये विलीन होणार आहे. त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत जनता शिवसेनेलाच स्वीकारणार आहे. भाजप व काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिवसेना जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक स्वबळावर लढेल असे जाहीर करतानाच एखाद्या गावात गाव पॅनेल असेल तर जनमताचा आदर करीत शिवसेना त्यांच्यासोबत राहील, असेही ते यावेळी म्हणाले.
आमदार नाईक पुढे म्हणाले, शिवसेनेच्या माध्यमातून पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा विकासासाठी मोठा निधी आणला आहे. जिल्ह्यातील मटका, दारू अशा अवैध धद्यांवर पालकमंत्र्यांच्या आदेशावरूनच पोलीस कडक कारवाई करीत आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांचे जिल्ह्यात चांगले काम चालले आहे.
यापूर्वी नारायण राणेसुद्धा जिल्ह्यात सिने-कलाकारांना आणायचे, त्यावेळी आता टीका करणारे त्यांच्यावर का टीका करीत नव्हते ?, याचे त्यांनी उत्तर द्यावे. आमची 'ईडी' ची चौकशी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे आम्ही भाजपामध्ये जाण्याचा प्रश्नच नाही. ज्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे ते भाजपच्या वाटेवर आहेत, असा टोलाही आमदार नाईक यांनी यावेळी विरोधकांना लगावला.
राणेंचा भाजप प्रवेश कार्यकर्त्यांसाठी नाही!
मराठा मोर्चानंतर राणेंकडे मराठा समाजाने नेतृत्व दिले. त्याचा वापर ते आपल्या स्वार्थासाठी करीत आहेत. नारायण राणेचा भाजपा प्रवेश कार्यकर्त्यांसाठी नसून त्यांच्या मुलांच्या भवितव्यासाठी आहे. सतीश सावंत अथवा आणखी कोणा कार्यकर्त्यांना आमदार करण्यासाठी तर हा प्रवेश निश्चितच नाही, असे वक्तव्य आमदार वैभव नाईक यांनी यावेळी केले.