मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात महापूजा करु देणार नाही - मराठा क्रांती मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 04:43 PM2018-07-17T16:43:49+5:302018-07-17T16:44:17+5:30
मराठा समाजाच्या आरक्षणासह सर्व प्रश्न सोडवूनच मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी यावे; अन्यथा त्यांना पूजा करु देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.
पंढरपूर : मराठा समाजाच्या आरक्षणासह सर्व प्रश्न सोडवूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसानी आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी यावे; अन्यथा त्यांना पूजा करु देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यव्यापी बैठकीत सोमवारी येथील श्रीराम मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. राज्यभरात मराठा समाजाचे लाखोंचे 58 मोर्चे निघाले, पण सरकार आमची दखल घेत नसल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला. यावेळी, आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत मुख्यमंत्र्याना आषाढीची महापुजा करु देणार नाही, असे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजाभाऊ गायकवाड यांनी सांगितले. याचबरोबर, उपस्थितांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. सरकार मराठा समाजाचा अंत पाहत असून भविष्यात राज्यभरात समाजातर्फे उग्र आंदोलन झाल्यास, त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार राहिल असा इशारा दिला.
यावेळी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, मराठा महासंघ, छावा अशा संघटनांसह सर्वच पक्षातील मराठा समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, कोपर्डी घडनेतील अत्याचारित मुलीचे वडील बबन सुद्रीक, विवेकानंद बाबर, महेश डोंगरे, मिलिंद भोसले आदी उपस्थित होते.