काँग्रेससोबत जाणार नाही
By admin | Published: February 26, 2017 02:00 AM2017-02-26T02:00:52+5:302017-02-26T02:00:52+5:30
मतदारांनी पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजपाला कौल दिला आहे. त्यामुळे सत्तेसाठी कोणत्याही परिस्थितीत काँग्रेससोबत जाणार नाही आणि ज्यांना जायचे आहे त्यांना रोखणारही
मुंबई : मतदारांनी पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजपाला कौल दिला आहे. त्यामुळे सत्तेसाठी कोणत्याही परिस्थितीत काँग्रेससोबत जाणार नाही आणि ज्यांना जायचे आहे त्यांना रोखणारही नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला.
राज्यातील १० महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला अभूतपूर्व यश मिळाले. त्यानिमित्त पक्षातर्फे राज्यभर जल्लोष करण्यात आला. नरिमन पॉर्इंट येथील प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह अन्य भाजपा नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबई महापालिकेत ८४ जागांसह शिवसेना प्रथम क्रमांकावर तर ८२ जागांसह भाजपा दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी शिवसेना आणि भाजपासमोर पुन्हा युती करणे अथवा काँग्रेसचाच पर्याय आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना कोणत्याही परिस्थितीत काँग्रेससोबत जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आपला अजेंडा हा फक्त विकासाचा आहे. पारदर्शकतेच्या मुद्यावर कदापि तडजोड करणार नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत काँग्रेससोबत जाणार नाही आणि ज्यांना जायचे आहे त्यांना रोखणारही नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. भाजपाचे यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वासाच्या लाटेचे आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशात प्रामाणिक राजकारण सुरू केल्यामुळे देशात जनतेमध्ये विश्वास निर्माण झाला आहे.
ही विश्वासाची ही लाट आहे आणि ती कधीच ओसरणार नाही. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे या सर्व पक्षांचे जितके नगरसेवक निवडून आले त्याहून जास्त भाजपाचे नगरसेवक निवडून आले
आहेत. त्यामुळे भाजपा राज्यातील क्रमांक एकचा पक्ष बनला
असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)