लोकसभा निवडणूक लढवणार नाही, श्रीनिवास वनगा यांची मातोश्रीवर घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 02:37 PM2019-03-26T14:37:13+5:302019-03-26T14:48:09+5:30
पालघर लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत माजी खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे.
मुंबई - पालघर लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत माजी खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय मी स्वत: घेतला आहे, असे श्रीनिवास वनगा यांनी सांगितले. दरम्यान, श्रीनिवास वनगांच्या घोषणेनंतर शिवसेनेने पालघर लोकसभा मतदार संघातील उमेदवार म्हणून राजेंद्र गावित यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे.
शिवसेनेने भाजपाच्या ताब्यातील पालघर मतदारसंघ आपल्यासाठी मागून घेतला होता. तसेच या मतदारसंघातून माजी खासदार चिंतामण वगना यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देण्यात येईल, अशी घोषणाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र काही अंतर्गत घडामोडीनंतर या मतदारसंघातील विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवतील, अशी माहिती समोर आली. दरम्यान, त्यामुळे श्रीनिवास वनगा यांची पुढील भूमिका काय असेल याची उत्सुकला लागली होती. अखेर आज श्रीनिवास वनगा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वनगा म्हणाले की, तुम्ही सर्वांनी दिलेले प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. आता आगामी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय मी स्वत: घेतला आहे.''
दरम्यान, श्रीनिवास यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याची इच्छा माझ्याकडे व्यक्त केली. मात्र त्यांना संसदेत पाठवण्याचा शब्द मी दिलेला होता. तो शब्द अद्याप कायम आहे. सध्या श्रीनिवास यांची विधिमंडळात आमदार म्हणून काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळे मी त्यांना आगामी निवडणुकीत आमदार म्हणून पाठवेन, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.