मराठीची सक्ती करणार नाही - शिक्षणमंत्री विनोद तावडे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 02:00 AM2018-11-21T02:00:29+5:302018-11-21T02:00:58+5:30
राज्यातील शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य करण्याचा निर्णय घेता येणार नाही, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
मुंबई : राज्यातील शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य करण्याचा निर्णय घेता येणार नाही, असे शिक्षणमंत्रीविनोद तावडे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. मराठी सक्ती करणार नसल्याचे सांगत शिक्षणमंत्र्यांनी मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्वत:च दिलेल्या आश्वासनापासून घूमजाव केले आहे.
शिवसेना सदस्य विलास पोतनीस यांनी मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता. त्यावर हा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे लेखी उत्तर तावडे यांनी दिले. विचाराधीन प्रस्तावाबाबत अधिक माहिती विचारली असता, मराठी अनिवार्य करणार नसल्याचे तावडे म्हणाले.
मराठी अनिवार्य करणार नसल्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या भूमिकेवर विलास पोतनीस यांनी आश्चर्य व्यक्त केले. अनेक राज्यांनी आपापल्या राज्यातील भाषांची सक्ती केली आहे. अगदी अलीकडेच गुजरातने सर्व शाळांमध्ये गुजराती भाषेची सक्ती केली आहे. त्यामुळे मराठीत असा निर्णय घेण्यात कसली अडचण आहे, असा प्रश्नही पोतनीस यांनी विचारला आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ इत्यादी राज्यात दहावीपर्यंत स्थानिक भाषा अनिवार्य आहेत, असेही ते म्हणाले.
गत अधिवेशनादरम्यान तावडे यांनी सर्व अमराठी शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. राज्यपालांच्या भाषणाचा मराठी अनुवाद न झाल्याने सदस्यांना इंग्रजी भाषण ऐकावे लागले होते. मराठी दिनाचे औचित्य साधून दहावीपर्यंत मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय एकमुखाने घेऊनच टाका, असा आग्रह विरोधकांनी धरला होता. त्याला भाजपा-शिवसेना सदस्यांनी पाठिंबा दिला होता. सभागृहाच्या भावना अभ्यास मंडळास कळवून त्या अनुषंगाने निर्णय घेण्यात येईल, असे तावडे म्हणाले होते.