भाजपबरोबर जाणार नाही; काँग्रेसबरोबरच ‘राष्ट्रवादी’ : तटकरे

By admin | Published: November 5, 2015 01:03 AM2015-11-05T01:03:44+5:302015-11-05T01:05:36+5:30

कोल्हापूरकर नाराज

Will not go with BJP; 'Nationalist' along with Congress: Tatkare | भाजपबरोबर जाणार नाही; काँग्रेसबरोबरच ‘राष्ट्रवादी’ : तटकरे

भाजपबरोबर जाणार नाही; काँग्रेसबरोबरच ‘राष्ट्रवादी’ : तटकरे

Next

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसबरोबरच आघाडी करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे, मंगळवारी तशी घोषणाही झाली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.महापालिकेत काँग्रेसचे २७, तर राष्ट्रवादीचे १५ नगरसेवक निवडून आले आहेत. बहुमतासाठी ४१ सदस्यांची गरज असते. दोन्ही काँग्रेसचे मिळून ४२ सदस्य होतात. शिवाय दोन अपक्षांनी यापूर्वीच काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या दोन पक्षांकडे स्पष्ट बहुमत असताना भाजपचे नेते व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी महापौर भाजपचाच होईल, असे जाहीर करून खळबळ उडवून दिली. तसे करण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा द्यावा लागतो. त्याशिवाय हे शक्य होत नाही. पालकमंत्र्यांनीही राजकारणात काहीही चमत्कार होतात, असे आत्मविश्वाासपूर्वक सांगितल्याने राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ ने तटकरे यांच्याशी संपर्क साधला. तटकरे म्हणाले, कोल्हापुरात दोन्ही काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. स्थानिक जनतेचा जनादेशही तसाच आहे. या दोन पक्षांच्या आघाडीची रितसर घोषणाही झाली आहे. शिवाय काँग्रेसबरोबर आघाडी करून राष्ट्रवादी सत्तेत येत असताना भाजपला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. पालकमंत्री पाटील हे कोणत्या संख्याबळावर महापौर करणार हे तुम्ही त्यांनाच विचारलेले बरे.


कोल्हापूरकर नाराज
ऐन निवडणुकीत कदमवाडीत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर व ताराराणी आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक सत्यजित कदम यांच्यात राडा झाला. दोघांचीही कार्यालये फोडण्यात आली. लाटकर यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. प्रचारात ताराराणी आघाडीचे संयोजक असलेले माजी महापौर सुनील कदम आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यात जोरदार चिखलफेक झाली. तरीही ते सगळेच पंचगंगेत बुडवून ताराराणी आघाडीचे नेते आमदार महादेवराव महाडिक यांनी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा महापौर होऊ नये यासाठी ‘राष्ट्रवादी’ला बिनशर्त पाठिंबा देण्याचा प्रस्ताव दिल्याने त्याबद्दलही लोकांतून नाराजी व्यक्त झाली. कुटुंबातील तीन पक्षांतून तिघे राजकारण करणारे महाडिक शहाणे की त्यांना निवडून देणारी कोल्हापूरची जनता मूर्ख, अशी विचारणा मुश्रीफ यांनीच केली होती. महाडिक गटाच्या हालचालीवर शहरवासीयांत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Web Title: Will not go with BJP; 'Nationalist' along with Congress: Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.