भाजप सरकार आल्याशिवाय दिल्लीत जाणार नाही - फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2020 05:05 AM2020-02-09T05:05:42+5:302020-02-09T05:06:13+5:30
विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेचा वर्धापनदिनानिमित्त मेळावा झाला, त्यात फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मी मैदान सोडून पळणाऱ्यांपैकी नाही. मी महाराष्ट्र सोडणार नाही, असे सांगत महाराष्ट्रात भाजपचे सरकार पुन्हा येत नाही तोपर्यंत मी दिल्लीत जाणार नाही, असा निर्धार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सध्याचे सरकार हाराकिरी करून आलेले आहे, असे ते म्हणाले.
विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेचा वर्धापनदिनानिमित्त मेळावा झाला, त्यात फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. तीन चाकी रिक्षाप्रमाणे हे सरकार आहे. रिक्षाची चाके एकाच दिशेने जातात. मात्र, याची चाके तिन्ही बाजुला विरुद्ध दिशेने जात आहेत. आम्ही कोणाचा विश्वासघात केलेला नाही. उलट आताचे ठाकरे सरकार हे विश्वासघातकी सरकार आहे. ते फार काळ टीकणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. आताच्या सरकारने एकच काम केले. ते म्हणजे आम्ही जे चांगले निर्णय घेत विकासकामांसाठी गती वाढवली होती. ते त्यांनी थांबविण्याचे काम केले. शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी आहे. आमच्यापेक्षा यांच्या अटी जाचक आहेत. त्यामुळे काहीच शेतकºयांना याचा लाभ मिळेल, असे ते म्हणाले.
आम्ही बदल्याच्या भावनेने कधीही वागलो नाही. आम्ही प्रगतीच्या दिशेने जात होते. आता हे सरकार प्रगती नाही तर स्थगिती सरकार आहे, अशीही टीका त्यांनी केली. एवढेच नाही तर शिवस्मारकाचे काम या सरकारने जाणीवपूर्वक थांबवले आहे, असाही आरोप त्यांनी केला. लोकशाहीची मूल्य या सरकारला मान्य नाहीत. आमच्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला तर आम्हीही रस्त्यावर उतरवू. आम्ही संघर्षातून पुढे आलो आहोत. त्यामुळे तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विनायक मेटे आदींची भाषणे झाली. आमदार भारती लव्हेकर, आमदार भीमराव
केराम, तानाजीराव शिंदे आदी उपस्थित होते.