निधी कमी पडू देणार नाही- सवरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2016 02:54 AM2016-11-02T02:54:46+5:302016-11-02T02:54:46+5:30
कुपोषण निर्मूलनासाठी एकात्मिक बालविकास विभाग व आरोग्य विभागाला आदिवासी विभागाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही
विक्रमगड : पालघर जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी एकात्मिक बालविकास विभाग व आरोग्य विभागाला आदिवासी विभागाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी वाडा येथील भाजपा कार्यालयात विक्रमगडच्या पत्रकारांशी संवाद साधतांना दिली.
तसेच कुपोषण निर्मूलन, सार्वजनिक आरोग्य व रोजगार यासाठी शासनाकडून विशेष योजना राबविण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. औद्योगिक कारखान्यांच्या डी झोनच्या सवलती कमी झाल्याने काही कारखाने स्थलांतर करण्याच्या मार्गावर आहेत. या पाशर््वभूमीवर ही कारखानदारी टिकविण्यासाठी उद्योगांना विदर्भ-मराठवाड्यातील उद्योगांना देण्यात आलेल्या विशेष पॅकेजच्या धर्तीवर पॅकेज देण्यासाठी व डी झोनमधील सवलती वाढविण्यासाठी आपण पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील रस्ते, पुल शासकिय इमारती व इतर योजनांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येत आहे. तसेच पालघर येथील जिल्हा मुख्यालयातील सर्व विभाग एका छताखाली आणण्यासाठी इमारतींचे काम लवकरच सुरू करणार असून पालघर येथे जिल्हा प्रशासनाचे २४ नवीन विभाग सुरू झाले असून उर्विरत विभागही लवकरच सुरू करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. आदिवासी विकास विभागाच्यावतीने आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश देवून दर्जेदार शिक्षण देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र पाचगणी सारख्या लांब अंतराच्या शाळांमध्ये जिल्ह्यातील विद्यार्थी राहण्यासाठी नाखूष असल्याचे आढळले आहे. या विद्यार्थ्यांना जिल्ह्यातीलच नामांकित शाळांमध्ये शिक्षण घेता यावे यासाठी जिल्ह्यातील नामांकित शाळांनी आपले प्रस्ताव आदिवासी विभागाकडे द्यावेत, असे आवाहनही यावेळी बोलतांना विष्णू सवरा यांनी केले आहे.
चाळीस किमी अंतरावर असलेल्या सर्व आश्रमशाळांकरीता मध्यवर्ती किचन करून ते ऐकाचवेळी सर्व ठिकाणी पुरविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच जातपडताळणीमधील लबाडी रोखण्यासाठी आता आॅनलाइन सेवा सुरु केल्याने खोटी प्रमाणपत्र घेता येणार नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. (वार्ताहर)
>विक्रमगड-वाडा-भिवंडी पुलांची लवकरच उभारणी
विक्र मगड व वाडा तालुक्यातील अंभई-केव या गावांना जोडणाऱ्या पुलासाठी सहा कोटी ५० लाख तर भिवंडी-वाडा तालुक्यातील उचाट-कुंदे या गावांना जोडणाराऱ्या पुलासाठी तीन कोटी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.