१६ ऑक्टोबरपर्यंत राजकीय स्टेटमेंट करणार नाही; बच्चू कडूंची भूमिका, काय आहे कारण?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 02:44 PM2023-08-30T14:44:31+5:302023-08-30T14:45:22+5:30
मी आजच्या दिवसानंतर १६ ऑक्टोबरपर्यंत कुठल्याही राजकीय विषयावर बोलणार नाही असं बच्चू कडू यांनी पत्रकारांना सांगितले.
नवी मुंबई – प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी १६ ऑक्टोबरपर्यंत कुठल्याही राजकीय विषयांवर प्रतिक्रिया देणार नाही असं विधान केले आहे. बच्चू कडू यांनी केलेल्या विधानाने राजकारणात आणखी काही उलथापालथ होणार की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे. पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू यांनी मी सचिन तेंडुलकर आणि कांदा प्रश्न यावरील आंदोलनाशिवाय कुठलेही राजकीय स्टेटमेंट १६ ऑक्टोबरपर्यंत करणार नाही असं म्हटलं आहे.
नवी मुंबईत पनवेल येथील कार्यक्रमासाठी बच्चू कडू आले होते. त्याठिकाणी पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, मी आजच्या दिवसानंतर १६ ऑक्टोबरपर्यंत कुठल्याही राजकीय विषयावर बोलणार नाही. फक्त कांदा शेतकरी आणि सचिन तेंडुलकर जाहिरात प्रकरणी मी बोलेन. बाकी कुठल्याही राजकीय प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. १६ ऑक्टोबरपर्यंत आमचे राजकीय मौन आहे. सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न आहे. त्यांनी गेमिंगबाबत जी जाहिरात केली ती अतिशय वाईट आहे. एखादे मोठे नेतृत्व जुगाराची जाहिरात करते. त्याचा प्रभाव आमच्या युवकांवर पडत आहे. युवकांची घरे बर्बाद होत असतील त्याला आमचा विरोध आहे. सचिन तेंडुलकरबाबत आदर पण त्यांना जाहिरात करायची असेल तर भारतरत्न परत करावे आणि जाहिरात करावी अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.
तसेच सचिन तेंडुलकर यांनी जाहिरात मागे घेतली नाही तर आम्ही त्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करून त्यांना भाग पाडू. आम्ही उद्या आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहोत. सचिन तेंडुलकर यांनी स्पष्टीकरण देवो न देवो आम्ही आंदोलन करू असंही बच्चू कडू म्हणाले. पुण्यात अजित पवार चंद्रकांत पाटील यांच्यात कॉल्डवॉर सुरू आहे. सरकारमध्ये नाराजी आहे का असा प्रश्न पत्रकारांनी बच्चू कडू यांना विचारला असता, मी राजकीय कुठल्याही प्रश्नाला उत्तर देणार नाही. सचिन तेंडुलकर आणि कांदा प्रश्नी बोलेन असं सांगितले.
दरम्यान, वारंवार सरकारमधील नाराजी, अजित पवारांच्या निर्णयावरून धुसपूस याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले तरीही मी १६ ऑक्टोबर कुठलीही राजकीय प्रतिक्रिया देणार नाही असा निर्णय घेतला आहे असं बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. त्यावर असं काय कारण आहे ज्यामुळे तुम्ही १६ ऑक्टोबरपर्यंत बोलणार नाही असा प्रतिसवाल पत्रकारांनी केला. त्यावर हे चांगले काम आहे. चांगल्या कामात अडथळा नको म्हणून मी हा निर्णय घेतला आहे असं उत्तर बच्चू कडूंनी दिले. त्यामुळे नेमकं १६ ऑक्टोबरपर्यंत काय घडणार आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.