रिकाम्या हाती परतणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 04:11 AM2017-08-02T04:11:41+5:302017-08-02T04:11:53+5:30

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी राज्यभर घोंगावलेले मराठा क्रांती मूक मोर्चाचे वादळ ९ आॅगस्टला मुंबईत धडकणार आहे.

Will not return empty handed! | रिकाम्या हाती परतणार नाही!

रिकाम्या हाती परतणार नाही!

Next

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी राज्यभर घोंगावलेले मराठा क्रांती मूक मोर्चाचे वादळ ९ आॅगस्टला मुंबईत धडकणार आहे. सकल मराठा समाजाच्या नेतृत्वाखाली मुंबईत राज्यव्यापी मोर्चा निघणार असून, या वेळी रिकाम्या हाती परतणार नसल्याचा निर्धार महामोर्चाच्या समन्वयकांनी व्यक्त केला आहे.
सकल मराठा समाजाच्या महामुंबई समितीमधील वीरेंद्र पवार यांनी सांगितले की, मुंबईतील महामोर्चासाठी सर्व जिल्ह्यांतील प्रतिनिधींनी कंबर कसली आहे. दादरमधील शिवाजी मंदिर येथे महामोर्चाची वॉररूम तयार केली आहे. अहमदनगर, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, सातारा यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींसोबत झालेल्या संपर्कातून महामोर्चाचे सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे नेमके किती लोक येतील, याची निश्चित आकडेवारी सांगणे चुकीचे ठरेल. मात्र मुंबई ठप्प पडेल, इतका मराठा समाज या महामोर्चात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महामोर्चाची रंगीत तालीम म्हणून ६ आॅगस्टला नवी मुंबई आणि रायगडमध्ये दुपारी ३ वाजता बाइक रॅली काढण्यात येणार असल्याचे महामुंबई समितीचे विनोद पोखरकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, राज्यभरात या आठवड्यात ठिकठिकाणी बाइक रॅली पाहायला मिळतील. मात्र महामोर्चा काढण्यात येणार असल्याने मुंबईत केवळ विभागनिहाय बाइक रॅली निघण्याची शक्यता आहे. तरीही नवी मुंबईतील बाइक रॅलीतून मुंबईच्या महामोर्चाचा अंदाज नक्कीच बांधता येईल.
समन्वयक चर्चेस तयार नाही!
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चर्चेसाठी केलेल्या आवाहनाला समन्वय समिती अनुकूल नसल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भातील बैठक चेंबूरमध्ये रविवारी पार पडली. त्यात ९ आॅगस्ट २०१६पासून राज्यभरात ५८ मोर्चे निघाले असून, समाजाच्या सर्व मागण्या सरकारला माहिती असल्यावर चर्चा झाली. त्यामुळे सरकारने जी काही घोषणा करायची आहे, ती एकतर विधानसभेत करावी किंवा मोर्चाला सामोरे जाऊन करावी, असा समन्वयकांचा होरा आहे.
मुंबईतील मोर्चासाठी कोल्हापूर सज्ज
कोल्हापूर : संपूर्ण महाराष्टÑभर लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले, पण निर्णय नाही. आता ‘क्रांतिदिनी, क्रांती घडवू या’, ‘चलो मुंबई’ असा नारा देत सकल मराठा समाजाच्या वतीने पुन्हा मराठा आरक्षणाचा धुरळा उडविण्यासाठी सारे सज्ज झाले. बैठका, रॅलीतून पुन्हा मावळे, रणरागिणी अंग झटकून कामाला लागले आहेत. या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून किमान ५० हजार जण उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मोर्चातील नियोजनाची सर्वस्वी जबाबदारी ही मावळे व रणरागिणीवर असते. त्यांची नोंदणी सध्या सकल मराठा समाज कार्यालयात केली जात आहे.
औरंगाबादला दुचाकी रॅली-
१औरंगाबाद : मुंबईत ९ आॅगस्टला काढण्यात येणाºया मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात मंगळवारी जनजागृतीसाठी दुचाकी रॅली काढण्यात आली. त्यात मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
२सुमारे दोन कि़मी.पर्यंतच्या परिसरात दुचाकी होत्या. शिवछत्रपती महाविद्यालय येथून शिस्तीमध्ये निघालेली ही रॅली जयभवानीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे सरकली. क्रांतिचौकात जोरदार घोषणा देत
शिस्तीने पैठणगेट मार्गे सिटीचौक ते लेबर कॉलनीपर्यंत रॅली आली. तेथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.
३कॅनॉट गार्डनमध्ये राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप झाला. रॅलीमध्ये कुठेही बेशिस्तपणा नव्हता. स्वयंसेवकांनी पोलिसांना मदत केली. मोर्चात सामील होण्यासाठी कॉर्नर बैठका, सोशल मीडियातून एसएमएस पाठविण्याचे नियोजन सुरू आहे, असे मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजन समितीने सांगितले.

Web Title: Will not return empty handed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.